पुणे : “कलाश्री संगीत मंडळ’ आणि “द औंध सोशल फाउंडेशन’ यांच्या संयुक्त विद्यमाने नवव्या “भारतरत्न पंडीत भीमसेन जोशी संगीत महोत्सवा’चे आयोजन करण्यात आले आहे. 11 ते 13 जून कालावधीत औंध येथील पं. भीमसेन जोशी कलामंदिरात तीन दिवस सायंकाळी 5 वाजता तो होणार आहे.
आमदार सिद्धार्थ शिरोळे यांच्या हस्ते त्याचे उद्घाटन होणार आहे. कार्यक्रम विनामूल्य आहे. या कार्यक्रमात मानसी कुलकर्णी, श्रीनिवास जोशी, पं. अविराज तायडे, पं. हेमंत पेंडसे, डॉ. विकास कशाळकर, यशस्वी सरपोतदार यांचे गायन होणार आहे. याशिवाय यज्ञेश रायकर यांचे व्हायोलिन वादन, डॉ. पूर्वा शहा यांचे कथक नृत्य, नंदकिशोर ढोरे यांचे तबलावादन होणार आहे.
महोत्सवाच्या शेवटच्या दिवशी अकोला येथील शास्त्रीय गायक डॉ. किशोर देशमुख यांना पंडित भीमसेन जोशी पुरस्कार प्रदान केला जाईल. दहा हजार रुपये रोख, शाल, श्रीफळ असे या पुरस्काराचे स्वरूप आहे, असे आयोजकांनी सांगितले.