नियमित करून घेण्यासाठी 15 जूनपर्यंत शेवटची संधी : अभय योजनेला आयुक्तांची मान्यता
पिंपरी – शहरामध्ये मोठ्या प्रमाणात नागरिकांनी अनधिकृत नळजोड घेतलेले आहेत. त्यामुळे महापालिकेचे आर्थिक नुकसान होत आहे. हे अनधिकृत नळजोड दंड भरून नियमित करण्यात येणार आहेत. त्यासाठी शेवटची संधी देऊन दंड भरून जोड अधिकृत नियमित करता येणार आहेत. त्यानंतर अशा अनधिकृत नळजोड घेतलेल्यांवर गुन्हे दाखल करण्यात येणार असून याकरिता तयार केलेल्या नव्या अभय योजनेला महापालिका आयुक्त तथा प्रशासक राजेश पाटील यांनी मान्यता दिली आहे.
सद्यःस्थितीत शहरात 1 लाख 65 हजार अधिकृत निवासी व व्यापारी नळजोड आहेत. तर, हजारो अनधिकृत नळजोड आहे. पालिकेच्या पाणीपुरवठा विभागाने अनधिकृत नळजोड खंडित करण्याची कारवाई सुरू केली. तसेच थेट नळाला जोडलेल्या विद्युत मोटारी जप्त करण्याची मोहीम सुरू केली आहे. जप्त केलेले पंप पुन्हा दिल्याने ते पुन्हा वापरले जातात. त्यामुळे या पुढे जप्त केलेले पंप पुन्हा दिले जाणार नसल्याचे पाणीपुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे.
अभय योजने अंतर्गत झोपडपट्टीतील अनधिकृत नळजोड अधिकृत करण्यासाठी एकूण 200 रूपये शुल्क आकारले जाणार आहे. त्यासाठी 31 ऑगस्टपर्यंत मुदत देण्यात आली आहे. तर झोपडपट्टी वगळता इतरांसाठी नळजोड अधिकृत करण्यासाठी 15 जूनपर्यंतच मुदत देण्यात आली आहे. त्यामुळे येत्या 15 दिवसांत नळजोड नियमित करावे लागणार आहे. जे नागरिक नळजोड नियमित करणार नाहीत त्यांना फौजदारी कारवाईला सामोरे जावे लागणार आहे.
काय हवी कागदपत्रे
नळजोड नियमित करण्यासाठी आधार कार्ड, मतदान ओळखपत्र, ड्रायव्हिंग लायसन्स, पॅन कार्ड, महापालिकेचे मिळकत बिल, वीज बिल, झोपडपट्टी पास आदी रहिवासी पुरावा आवश्यक आहे. नियमित करण्यायोग्य अनधिकृत नळजोडच नियमित करण्यात येणार आहेत. अनधिकृत नळजोड नियमित करता येणार नाहीत, असे नळजोड त्वरीत तोडण्यात येणार आहेत.
असा असेल दंड
15 मिमी व्यासाचे निवासी नळजोड अधिकृत करण्यासाठी 2 हजार रूपये अनामत रक्कम, 3 हजार रूपये दंड, 4 हजार 300 रूपये पाणीपट्टी असे एकूण 9 हजार 300 रूपये शुल्क आहे. तसेच, 30 जून 2018 नंतरच्या नळजोडीसाठी दरमहा 200 रूपये अतिरिक्त शुल्क आहे. 20 मिमी व्यासाच्या नळजोडसाठी 15 हजार 500 रूपये, 25 मिमी व्यासासाठी 28 हजार 550, 40 मिमी व्यासासाठी 67 हजार 200 आणि 50 मिमी व्यासाच्या नळजोडसाठी 91 हजार 100 रूपये शुल्क भरावे लागणार आहे.
15 मिमी व्यासाच्या वाणिज्य नळजोड अधिकृत करण्यासाठी एकूण 27 हजार 800 रूपये शुल्क आहे. दरमहा 1 हजार 500 रूपये अतिरिक्त शुल्क आहे. तर, 20 ते 50 मिमी व्यासाच्या नळजोडसाठी 48 हजार ते 2 लाख 28 हजार रूपये इतके शुल्क भरावे लागणार आहे. नळजोड अधिकृत करण्यासाठी 15 जूनपर्यंत अर्ज करण्याची मुदत आहे.