आयसीसीने क्रिकेटचा प्रसार करण्याचे काम हाती घेतल्यावर सगळ्यात आधी आशियाई तसेच क्रिकेट खेळत असलेल्या भारतासह विविध देशांच्या क्रिकेट चाहत्यांपर्यंत पोहोचण्यासाठी अमेरिकेतही मेजर क्रिकेट लीगला नवसंजीवनी देण्याचे निश्चित केले आहे. ही लीग पुढील वर्षी होणार असून यातून अमेरिका क्रिकेट संघटनेला आपला संघ 2024 साली होत असलेल्या विश्वकरंडक क्रिकेट स्पर्धेसाठी पात्र करायचा आहे. या लीगची रचना तयार केली जात असून त्यात मायक्रोसॉफ्ट कंपनीने उच्च तंत्रज्ञानातून तयार केलेल्या पॉवर बॅट्स व विविध गॅजेट्सचा वापर पहिल्यांदाच होणार आहे. यात पॉवर बॅट ही संकल्पना नव्याने दाखल होत असून त्याची पायाभरणी केली आहे चक्क एका भारतीय क्रिकेटपटूच्या मालकीच्या स्टार्टअपने.
अनिल कुंबळे या नावाची जादू आपण अनेक वर्षे पाहिली आहे, आता तोच आपल्या स्टार्टअपच्या माध्यमातून अमेरिकेच्या क्रिकेटमधील प्रगतीसाठी मिडास टच ठरेल. जागतिक क्रिकेटमध्ये डीआरएस, बॉल ट्रॅकरसह विविध प्रकारचे नवे तंत्रज्ञान विकसित झाले. आता या पॉवरबॅट्स फलंदाजांच्या हाती दिसणार आहेत. बॅटला चेंडू लागल्यावर त्या बॅटला लावलेल्या इलेक्ट्रॉनिक स्टीकरच्या माध्यमातून फलंदाजाचे तंत्र किती योग्य आहे. चेंडू बॅटला कुठे लागला, त्याचा इम्पॅक्ट किती होता, फलंदाजाने मारलेला फटका, त्याचा वेग यांसह अनेक प्रकारची नोंद घेतली जाणार आहे. कुंबळेच्या कंपनीने केलेल्या रचनेत काही सुधारणा करत ही पॉवर बॅट मायक्रोसॉफ्टने प्रत्यक्षात आणली आहे.
आता या लीगद्वारे जागतिक क्रिकेटमध्ये अमेरिकेचाही संघ दाखल होत असल्याचीच ही नांदी आहे. एकदिवसीय विश्वकरंडक क्रिकेट स्पर्धेच्या पहिल्या मोसमात कॅनडाचा संघ खेळला होता, त्यावेळी त्यांची कामगिरी पाहून भविष्यात हा संघ क्रिकेट खेळणारच नाही, असे वाटले व तसे प्रत्यक्षात घडलेही. आता अमिरेकेचाही संघ दाखल होत आहे; पण फरक हा आहे की ते पहिल्यांदा अभ्यास करून परीक्षेला बसणार आहेत. ब्रिटिशांनी सुरू केलेल्या प्रत्येक गोष्टीला विरोध करणारी अमेरिका क्रिकेटसमोर व त्यातून दिसत असलेल्या पैशांसमोर झुकणार अशीही टीका आता होऊ लागली आहे; पण यातून एक गोष्ट स्पष्ट होते की, क्रिकेट खऱ्याअर्थाने ग्लोबल होत आहे.
लक्षवेधी
* पॉवरबॅट्सचा वापर प्रायोगिक तत्त्वावर
* रेकॉर्ड तपासून परिपूर्णतेची होणार खात्री
* प्रयोग यशस्वी झाल्यावर लिस्ट ए सामन्यांतही होणार वापर
* खेळाडूंच्या दुखापतींची माहिती तंत्रज्ञानाद्वारे मिळणार
* हायटेक गॅजेट्सचा अंतर्भाव
* मायक्रॉसॉफ्टसह अडॉब कंपनीची कोट्यवधींची गुंतवणूक
* स्थानिक खेळाडूंना प्रशिक्षणातून तंत्रज्ञानाचा वापर
* पॉवर बॅट, सरफेस टॅब्लेट्स, स्पोर्टस परफॉर्मन्स प्लॅटफॉम
* हायटेक हार्डवेअर व सॉफ्टवेअरचाही वापर
* फुटबॉल व बेसबॉल सामन्यातही होत आहे प्रयोग
* मशीन लर्निंग, प्रेडिक्टिव्ह ऍनालिटिक्सचा वापर
* ऑस्ट्रेलिया, पोर्तुगाल व अमेरिकेतील महाविद्यालयातही प्रयोग
* जगभरातील फुटबॉल क्लबमध्ये यशस्वी
कुंबळेच्या स्टार्टअपचे यश
भारतीय संघाचा माजी कसोटीपटू, कर्णधार अनिल कुंबळे याने या तंत्रज्ञानाची स्टार्टअप कंपनी स्थापन केली होती. याच कंपनीला मायक्रोसॉफ्टने सहकार्य केले असून यातूनच ही प्रणाली विकसित करण्यात आली आहे. त्यातच पॉवर बॅटची संकल्पना कुंबळे याने मांडली. याच संकल्पनेला मायक्रोसॉफ्टने प्रत्यक्षात आणले.