पालघर – पालघरमधील वाघोबा खिंडीजवळ आज एसटी 20 फूट खोल दरीत कोसळून भीषण दुर्घटना घडली. या दुर्घटनेत एसटीमधील 15 ते 20 प्रवाशी गंभीर जखमी झाले आहेत. जखमींवर सध्या पालघर ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
प्राथमिक माहितीनुसार, पालघर परिसरात एसटी महामंडळाकडून रातराणी या बसेसच्या फेऱ्या सुरु असतात. भुसावळ ते बोईसर या एसटीचा वाघोबा खिंडीत पहाटे सहा वाजता अपघात झाला. यावेळी त्याचे एसटीवरील नियंत्रण सुटले आणि एसटी थेट 20 फूट खोल दरीत जाऊन कोसळली. सुदैवाने या घटनेत कोणाचाही मृत्यू झाल्याची माहिती समोर आली नाही.
पालघर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. तसेच जखमींना तत्काळ एसटीमधून बाहेर काढत पालघरच्या शासकीय रुग्णालयात दाखल केले. या अपघाताची नोंद करत पोलिसांनी तपास सुरू केला.
दरम्यान, अपघात घडला त्यावेळी चालक मंद्यधुंद अवस्थेत होता. यामुळे प्रवाशांनी चालकावर आक्षेपही घेत एसटीच्या कंडक्टरकडे तक्रार केली. मात्र, कंडक्टरने त्याच्याकडे दुर्लक्ष केल्यानेच हा अपघात झाल्याचा आरोप प्रवाशांकडून करण्यात येत आहे.