मुंबई – राज्यसभेच्या सहाव्या जागेसाठी अखेर आज शिवसेनेकडून आपला उमेदवार निश्चित करण्यात आला आहे. कोल्हापूर जिल्हा शिवसेना प्रमुख संजय पवार यांच्या नावावर पक्षाने शिक्कामोर्तब केल्याची बातमी देण्यात आली. संभाजीराजे छत्रपती यांना उमेदवारी दिली जाण्याची शक्यता वर्तवण्यात आली होती. ती फोल ठरली आहे.
संभाजी राजे यांना शिवसेनेचे पक्षप्रमुख तसेच मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी सशर्त उमेदवारी देण्याची तयारी दर्शवली होती. संभाजीराजे यांनी शिवसेनेकडून लढावे ही अट त्यांना घालण्यात आली होती. मात्र ती त्यांनी मान्य केली नसल्याची कालची बातमी होती. त्यानंतर अखेर आता आपल्या कट्टर शिवसैनिकालाच रिंगणात उतरवण्याचा निर्णय शिवसेनेने घेतला आहे.
संजय पवार यांनी अण्णासाहेब पाटील महामंडळाचे उपाध्यक्ष म्हणूनही काम पाहिले आहे. तसेच नगरसेवक ते जिल्हाप्रमुख असा त्यांचा प्रवास राहिला आहे. राज्यसभेच्या सहाव्या जागेवर अपक्ष लढणार असल्याची भूमिका यापूर्वीच संभाजीराजे यांनी घेतली. सर्वपक्षीय आमदारांनी आपल्याला पाठिंबा देण्याची मागणी सुद्धा संभाजीराजेंनी केली आहे. पण आता शिवसेनेने संजय पवार यांना उमेदवारी दिल्याने संभाजीराजे माघार घेतात की अपक्ष म्हणून रिंगणात उतरतात हे औत्सुक्याचे ठरणार आहे.
दरम्यान, शिवसेनेच्या या निर्णयामुळे मराठा समाज संघटनांमध्ये नाराजी असल्याचेही वृत्त काही संकेतस्थळांवर पसरले आहे. मात्र त्याबाबत कोणी जाहीर टिप्पणी केलेली नाही. शिवसेना अथवा महाविकास आघाडीतीलही कोणत्या पक्षाने यावर काही भाष्य केलेले नाही.