10 संचालक बिनविरोध : आमदार थोपटे यांचे वर्चस्व कायम
भोर – राजगड सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत 10 संचालकांची बिनविरोध जाहिर झाली आहे. 7 संचालकांपदाच्या जागेसाठी 11 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत, अशी माहिती निवडणूक निर्णय अधिकारी तथा भोरचे उपविभागीय अधिकारी राजेंद्र कचरे यांनी दिली.
बुधवार (दि.18) उमेदवारी अर्ज मागे घेण्याचे अखेरच्यादिवशी एकूण 31 उमेदवारापैकी 19 उमेदवारांनी उमेदवारी अर्ज मागे घेतले. 17 संचालकपदासाठी 10 संचालकांची बिनविरोध निवड झाली आहे. 7 संचालकपदासाठी 11 उमेदवार निवडणूक रिंगणात उतरले आहेत. गुरुवार (दि.19) उमेदवारांना निवडणूक चिन्हाचे वाटप करुन राजगडच्या निवडणुकीत ऐन उन्हाळ्यात रंगत आली आहे. त्यामुळे प्रचाराचा धुरळा कारखाना कार्यक्षेत्रात पाहावयास मिळणार आहे. (दि.29) निवडणुकीची प्रक्रिया पार पडणार आहे. (दि.31) मतमोजणी
होणार आहे.
गटनिहाय निवडणुकीतील उमेदवार पुढीलप्रमाणे- गट क्र. 1- भोर देवपाल ( 2 संचालक)- रामचंद्र पर्वती कुडले, सुभाष मारुती कोंढाळकर, उत्तम नामदेव थोपटे, गट क्रमांक -2 येवली- हातवे बु- (3 संचालक) सुधीर चिंतामण खोपडे, पंडित रघुनाथ बाठे, विलास अमृत बांदल, सोमनाथ गणपत वचकल, पोपटराव नारायण सुके, गट क्रमांक -5 रुळे, वरसगाव, पानशेत ( 2 संचालक) रामदास किसन गायकवाड, दिनकर सोनबा धरपाळे, प्रताप धोंडीबा शिळीमकर.
बिनविरोध संचालक
गटनिहाय बिनविरोध उमेदवार पुढीलप्रमाणे- सारोळा- गुणंद, खंडाळा- के. डी. सोनवणे, दत्तात्रय दिनकर चव्हाण, गट क्रमांक 4- कापूरहोळ, वेळु, हवेली- विकास नथुराम कोंडे, शिवाजी खंडेराव कोंडे, ब वर्ग सहकार उत्पादक बिगर उत्पादक संस्था व पणन संस्था- आमदार संग्राम थोपटे, अनुसुचित जाती जमाती प्रवर्ग गट- अशोक कोंडीबा शेलार, महिला राखीव प्रतिनिधी- सुरेखा अमोल निगडे, शोभा हरिभाऊ जाधव, इतर मागास प्रवर्ग- संदीप किशोर नगिने, भटक्या विमुक्त जाती जमाती- चंद्रकांत रामचंद्र सागळे.
फुसक्या बारची चर्चा रंगली
राजगड सहकारी साखर कारखान्याची निवडणूक बिनविरोध व्हावी, यासाठी आमदार संग्राम थोपटे यांनी अखेरच्या क्षणापर्यंत राष्ट्रवादी आणि उमेदवारांची मनधरणी केली. मात्र, त्याला विरोधकांनी योग्य प्रतिसाद दिला नसल्याने ही निवडणूक जाहिर झाली. राष्ट्रवादीच्या 11 पैकी 9 उमेदवारांची रद्द झालेली उमेदवारी साखर सहसंचालकांनी 9 उमेदवारांची अपीलातील सुनावणीत वैध ठरवली असताना राष्ट्रवादीच्या चारच उमेदवार निवडणुकीत उतरले आहेत. यात भाजपाच्या एका उमेदवाराचा समावेश असल्याचे समोर आले आहे. कॉंग्रेसच्या पॅनलच्या उमेदवारांना कपबशी चिन्ह मिळाले आहे. विरोधातील तीन उमेदवारांना किटली तर एकाला नारळ चिन्ह मिळाले आहे. त्यामुळे भोरच्या आखाड्यात चहा- नारळाची चर्चा रंगली आहे. दरम्यान, राजगड कारखान्याच्या निवडणुकीची हवा तापली आहे.