वॉशिंग्टन – रशिया-युक्रेन युद्ध सुरू होऊन आता दोन महिन्यांपेक्षा जास्त कालावधी उलटला आहे. रशियाने युक्रेनवर लष्करी कारवाईचे आदेश दिल्यानंतर अमेरिका आणि मित्र राष्ट्रांनी रशियावर अनेक निर्बंध लादले असले तरी अमेरिका व जी-7 देश कच्चे तेल आणि गॅससाठी रशियावर अवलंबून असल्याने याबाबत कोणतेही निर्बंध लादले नाहीत. मात्र, आता अमेरिका व जी-7 देशांनी रशियाकडून कच्च्या तेलाची खरेदी बंद करण्याचा निर्णय घेतला आहे.
रशियाकडून तातडीने तेल खरेदी बंद केली जाणार नसून टप्प्या टप्प्याने ही खरेदी कमी केली जाणार आहे. जी-7 मधील अमेरिका, जर्मनी, ब्रिटन, कॅनडा, फ्रान्स, इटली आणि जपान हे सर्वच देश रशियाच्या कच्च्या तेलाचे उपभोक्ते आहेत.
दरम्यान, पुतीन यांचे मुख्य साधन नष्ट होईल आणि युद्ध लढण्यासाठी निधी संपेल, असं मत जी-7 देशांनी या निर्णयावरून व्यक्त केले.
दरम्यान युक्रेनमधील परिस्थिती भयावह असताना या युद्धाचा फटका रशियालाही बसू शकतो. रशियात लष्करी उठाव होण्याची शक्यता असल्याचा दावा अमेरिकेच्या माजी जनरलकडून करण्यात आला आहे.
पुतीन सत्तेवरून हटले तर त्यांची हत्या होऊ शकते, असा धक्कादायक दावा अमेरिकेचे माजी जनरल जॅक केन यांनी केला आहे. पुतीन यांच्या युद्धाच्या कमकुवत हाताळणीमुळे वरिष्ठ रशियन लष्करी अधिकारी व सुरक्षा सेवेतील लोक निराश असून आगामी काळात हा असंतोष अधिक भडकू शकतो.
दरम्यान, पुतीन सत्तेत राहण्यासाठी काहीही करू शकतात. पुतिन कुठेही जाणार नाहीत हे सत्य आपण स्विकारलं पाहिजे. कारण पुतीन यांना माहिती आहे. दुसरे कोणी सत्तेत आले तर ते जिवंत राहणार नाहीत, असेही जॅक केन म्हणाले आहेत.