झापोरिझ्झिया (युक्रेन) – सध्या सुरू असलेल्या रशिया-युक्रेन युद्धात रशियाला कोणतेही मोठे यश न मिळता सुद्धा अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी रशियात आज युद्ध विजय दिवस साजरा केला आणि त्यानिमीत्त त्यांनी रशियात सार्वत्रिक सुट्टी जाहीर केली होती. पुतीन यांनी सोमवारी मॉस्कोच्या रेड स्क्वेअरवर विजय दिनानिमीत्त आयोजित करण्यात आलेल्या परेडची मानवंदना स्वीकारली.
अनेक पाश्चात्य विश्लेषकांनी पुतिन हे या दिनाच्या निमीत्ताने युक्रेनमध्ये आक्रमक हालचालींची घोषणा करतील किंवा युक्रेनवरील कारवाईच्या वाढीची घोषणा करतील अशी अपेक्षा व्यक्त केली होती, परंतु त्यांनी तसे केले नाही. मात्र पुतीन यांनी यावेळी बोलताना रशियाने युक्रेनवर केलेल्या आक्रमणाचे समर्थन केले ते म्हणाले की, रशियाने आक्रमकतेला सडेतोड प्रत्युत्तर दिले आहे. या हल्ल्याचा निर्णय घेण्याची आमच्यावर सक्ती केली गेली त्यानुसार आम्ही वेळेवर निर्णय घेत आमच्यापुढील एकमेव पर्यायाचा वापर केला असे ते म्हणाले.
रशिया आणि युक्रेनच्या संघर्षाला आता 11 आठवडे झाले असून आता युक्रेनच्या पुर्वेला जमिनीवरील लढाई सुरू झाली आहे.युक्रेनकडून या लढाईत रशियाला कडवा प्रतिक्रार केला जात आहे. रशियाला या युद्धात आपण सहज विजय मिळवू असे वाटत होते पण अजून तरी युक्रेनच्या सैन्यांनी त्यांच्यापुढे नांगी टाकलेली नाही. युक्रेनला पाश्चिमात्य देशांची मदत मिळत आहे. या मदतीच्या आधारे आणि आपल्या शुर सैनिकांच्या पाठबळावर युक्रेनची ही शर्थीची झुंज सुरू आहे.