हैद्राबाद – 25 वर्षीय बी नागराजूची बुधवारी रात्री हैदराबादमध्ये एका मुस्लिम महिलेशी लग्न केल्याच्या कारणावरून हत्या करण्यात आली होती. नागराजूने पत्नी अश्रीन सुलताना सय्यद हिला ईदची खरेदी करण्यासाठी आपली सोन्याची साखळी विकली होती, असं आता समोर आले आहे.
रिपोर्टनुसार, नागराजू हा शहरातील मलकपेठ येथील एका कार शोरूममध्ये सेल्स एक्झिक्युटिव्ह म्हणून काम करत होता. शोरूमचे एचआर मॅनेजर के सतीश यांनी सांगितले की, आपल्याला नागराजूच्या लग्नाची नुकतीच माहिती मिळाली. त्यानंतर त्यांनी सोन्याच्या साखळीबद्दल सांगितले.
सतीश म्हणाले, “त्याने मला सांगितलं होत की, पत्नीला ईदच्या खरेदीसाठी चारमिनारला घेऊन जाणार आहोत. त्यासाठी आपण 25,000 रुपयांना सोन्याची साखळी विकली होती. तो खूप प्रामाणिक आणि कष्टाळू आणि निष्पाप होता. तो घरी जाताना गणवेश बदलून जायचा. पण बुधवारी संध्याकाळी उशीर झाल्यामुळे गणवेशातच निघून गेला. कारण त्याला त्याच्या बहिणीच्या घरून पत्नीला घेऊन जायचं होतं.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, स्कूटरवरून आलेले हल्लेखोर सय्यद मोबीन अहमद आणि मोहम्मद मसूद अहमद यांनी या जोडप्याला रस्त्यात थांबवले. त्यानंतर नागराजू यांच्यावर प्रथम लोखंडी रॉडने आणि नंतर चाकूने हल्ला केला. त्यात त्यांचा जागीच मृत्यू झाला.