नवी दिल्ली – महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांनी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचं कौतुकही केलं होतं. तेव्हापासून राज ठाकरे कट्टर हिंदुत्वासह भाजपसोबत जाणार अशी चर्चा सुरू झाली होती. मात्र राज यांना गुरुवारी भाजप खासदाराने कडाडून विरोध करत इशारा दिला होता. त्याला मनसेकडून अभिजीत पानसे यांनी प्रत्युत्तर देण्यात आलं होतं. या प्रत्युत्तरानंतर भाजप खासदाराने मनसैनिकाला चांगलच फटकारलं.
उत्तर प्रदेश व बिहारच्या लोकांवर मनसेच्या लोकांनी केलेल्या हल्ल्यांबद्दल व त्यांच्या अपमानाबाबत राज ठाकरे यांनी हात जोडून या राज्यांसह संपूर्ण उत्तर भारताच्या जनतेची जाहीर माफी मागावी. माफी मागितल्याशिवाय त्यांना अयोध्येत घुसू देणार नाही, असा इशारा भाजप खासदार ब्रिजभूषण शरण सिंह यांनी दिला होता.
त्यानंतर मनसेचे नेते अभिजीत पानसे म्हणाले की, अशा लोकांना महाराष्ट्र सैनिक आणि स्वत: राज ठाकरे भीक घालत नाहीत. राज ठाकरेंबद्दल बोललं की प्रसिद्धी मिळते. त्यांना ती प्रसिद्धी मिळाली आहे. पण हे झाल्यानंतर त्यांना उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा फोन गेलेला आहे. त्यांना योगींनी गप्प बसा सांगितलं असं अभिजीत पानसे यांनी सांगितलं आहे.
दरम्यान या प्रकरणात मनसेचे नेते तुलसी जोशी यांनी खासदार ब्रिजभूषण यांना फोन केला. मात्र जोशी यांनी ब्रिजभूषण यांच्या संतापाला सामोरं जावं लागलं. फोन करून जोशी म्हणाले की, मी राज ठाकरे यांचा छोटासा मनसे सैनिक आहे. माझे नाव तुलसी जोशी आहे. आपण प्रभू रामचंद्रांच्या अयोध्यामधून खासदार आहात. तुमचे स्वागत आहे. मात्र, राज ठाकरे यांच्याविरोधात वक्तव्य केले तर तुमचे नाव गिनिज बुकमध्ये, लिम्का बुकमध्ये तुमची नोंद होणार नाही. तुम्ही जे राज ठाकरे यांच्याबाबत वक्तव्य केले आहे, ते योगींच्या सल्ल्याने केले का? तुमचा तसा स्वभाव नाही. मात्र, योंगीच्या सल्लाने तुम्ही बोलत आहात, असा प्रश्न जोशी यांनी केला.
त्यावर खासदार बृजभूषण स्पष्ट म्हणाले, योंगीकडून आम्ही सल्ला घेत नाही. योगींना गरज पडली तर ते आमच्याकडून सल्ला घेतात. या संभाषणाची ऑडिओ क्लीप सोशल मीडियावर जोरदार व्हायरल झाली आहे.