मुंबई – महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे संस्थापक अध्यक्ष राज ठाकरे यांनी मुंबईत झालेल्या सभेत मशिदीवरील भोंगे याबाबत भूमिका जाहीर केल्यानंतर आरोप प्रत्यारोप यांना सुरुवात झाली आहे. शिवसेनेकडून हिंदुत्वाच्या मुद्द्यावरुन भाजप तसेच मनसे पक्षावर जोरदार डिंक करण्यात येत आहे. याच आरोपांवरून भाजपचे प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर हिंदुत्वाच्या मुद्द्यावरुन बोचरी टीका केली आहे.
नेमकं काय म्हणाले भाजपचे प्रवक्ते केशव
‘भाजपावर तुटून पडा, असे आदेश वर्क फ्रॉम होम करणाऱ्या मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सेना प्रवक्त्यांना नुकतेच दिलेत म्हणे. त्यात भाजपाचं हिंदुत्व खोटं ठरवण्यासही सांगितलंय. पण ज्यांचं हिंदुत्व मुख्यमंत्रीपदासाठी पवार-गांधींकडे गहाण पडलंय. ज्यांचा हिंदुत्वाशी संबंध केवळ बोलण्यापुरता राहिलाय. त्यांनी भाजपाच्या हिंदुत्वावर बोलूच नये. भाजपासाठी हिंदुत्व हा आत्मा आहे. तुमच्यासारखं गरज असेल तेव्हा वापरलं आणि नसेल तेव्हा सोडून दिलं, असलं आम्ही कधी केलं नाही. म्हणूनच राम मंदिर, कलम ३७०सारखे मुद्दे आम्ही मार्गी लावलेत. आज तुम्ही हिंदुत्वाला अनुकूल अशी कुठलीही भूमिका घेतलीत तर तुमच्या सरकारच्या कुबड्या पवार आणि सोनिया गांधी झटकन काढून घेतील, म्हणूनच तुम्ही त्यांना सोईस्कर अशाच भूमिका घेताय, त्यात हिंदू हित शुन्य आहे. थोडक्यात तुमच्या हिंदुत्वाची अवस्था दात आणि नखे काढलेल्या वाघासारखी झालीय. तो केवळ डरकाळ्या फोडू शकतो, त्याकडून बाकी काही होणे शक्य नाही. तुमच्या नाकर्त्या कारभारामुळे तुमचे कार्यकर्ते तुमच्यापासून ‘तुटले’ आहेतच. ‘पडा’यचे बाकी आहे, ते निवडणुकीत होऊन जाईल!’