लंडन – दोन वर्षांच्या कालावधीमध्ये करोना विषाणूशी झुंज देताना आरोग्य तज्ज्ञांना अनेक प्रकारचे अनुभव आले. या विषाणुची बाधा झाली असली तरी ठराविक कालावधीमध्ये रुग्ण बरा होऊन घरी परतत असे. पण आता ब्रिटनमधील एका रुग्णाच्या नावावर सर्वात जास्त काळ करोना विषाणूशी लढा दिल्याचा विक्रम नोंदवण्यात आला आहे. हा रुग्ण तब्बल पाचशे पाच दिवस या महामारीशी लढत होता.
लंडनमधील किंग कॉलेजने इतर काही आरोग्य संस्थांच्या मदतीने 2020 आणि 2021 या दोन वर्षांच्या कालावधीमध्ये अतिशय कमकुवत प्रतिकारक क्षमता असणाऱ्या नऊ रुग्णांचा अभ्यास केल्यानंतर त्या अभ्यासातील निष्कर्षांमध्ये या रुग्णाची माहिती देण्यात आली आहे. यापूर्वी एका रुग्णाच्या नावावर तब्बल 335 दिवस करोना महामारीचा मुकाबला करण्याचा विक्रम नोंदवण्यात आला होता;
पण त्या विक्रमाला मागे टाकत या रुग्णाने तब्बल 505 दिवस करोनाशी मुकाबला केला आहे. या रुग्णासह इतर सर्व 8 रुग्णांच्या सर्व आरोग्य प्रक्रियेचा सविस्तर अभ्यास आरोग्य तज्ज्ञ करत आहेत. दीर्घकाळ विषाणूशी लढणाऱ्या या रुग्णांच्या शरीरातील बदल, त्यांची प्रतिकार क्षमता आणि त्यांच्या शरीरामध्ये विषाणूचे म्युटेशन होण्याची शक्यता या सर्व गोष्टींचा अभ्यास केला जात आहे. कमी प्रतिकार क्षमता असणाऱ्या आणि दीर्घकाळ करोनाशी लढणाऱ्या रुग्णांचे निधन होण्याचे प्रमाण जास्त असले तरी या सर्व रुग्णांनी दीर्घकाळ झुंज देऊन सुखरूप राहण्याचा विक्रमही नोंदवला असल्याने ती एक महत्त्वाची गोष्ट मानली जात आहे.