झाशी – मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या आवाहनानुसार बुंदेलखंडची भूमी असलेल्या झाशीतून संपूर्ण देशात सर्वधर्म समभावाचा संदेश गेला आहे. राम जानकी मंदिराच्या पुजाऱ्यांनी आणि जामा मशिदीच्या इमामांनी अनुक्रमे मंदिर आणि मशिदीवरील लाऊडस्पीकर सामोपचाराने हटवण्याचा निर्णय घेतला आहे.
मंदिराचे पुजारी शांती मोहन दास आणि मशिदीचे इमाम हाफिज मोहम्मद ताज आलम यांनी सांगितले की, समाजात जातीय सलोख्याचा संदेश देण्यासाठी अनेक दशकांपूर्वी लावण्यात आलेले जुने लाउडस्पीकर काढून टाकण्याचा निर्णय घेतला आहे.
झाशीच्या बारागाव भागातील गांधी चौकात राम जानकी मंदिर आणि जामा मशीद जवळजवळ आहे. मंदिरात पहाटे लाऊडस्पीकर लावून आरती करण्यात आली, तर मशिदीत पाचवेळच्या अजानची परंपरा अनेक दशकांपासून सुरू होती. मात्र आता मंदिरातील आरती आणि मशिदीतील अजान यापुढे लॉऊडस्पीकरमध्ये होणार नाही.
प्रेम आणि बंधुभावाचा संदेश देण्यासाठी हा निर्णय घेतल्याचे शांती मोहन दास यांनी सांगितले. ते म्हणाले की, आता लाऊडस्पीकरशिवाय सकाळ-संध्याकाळ आरती केली जात आहे. यासोबतच भजनाचा कार्यक्रमही शांततेत पार पडत आहे.
मशिदीचे इमाम हाफिज ताज आलम यांनी सांगितले की, दोन्ही धार्मिक स्थळांवरून लाऊडस्पीकर काढून टाकणे ही काळाची गरज आहे. आम्ही परस्पर बंधुभावाने जगत आहोत. त्यामुळे लाऊडस्पीकर अडथळा होऊ शकत नाही. हीच सद्भावना संपूर्ण देशात कायम राहावी आणि लोक शांततेत राहावेत अशी मी प्रार्थना करतो. दरम्यान आमच्याकडे छोटे स्पीकर आहेत ज्याचा आवाज मशिदीच्या बाहेर जाणार नाही याची खात्री आहे, असंही ते म्हणाले.
लाऊडस्पीकर काढण्याचा संदेश झाशीच्या दोन धार्मिक स्थळांवरून अशा वेळी गेला आहे जेव्हा देशात मंदिरे आणि मशिदींतील लाऊडस्पीकरवरून गदारोळ सुरू आहे.