पुणे –पुणे जिल्ह्यातील कोणत्याही जमिनीची मोजणी आता 30 मिनिटांमध्ये करणे शक्य होणार आहे. त्यासाठी 35 रोव्हर मशिन भूमि अभिलेख विभागाकडे दाखल झाल्या आहेत. या मशिनच्या सहाय्याने अचूक आणि कमी वेळेत मोजणी करणे आता शक्य होणार आहे. या 35 रोव्हरमुळे जिल्ह्यात महिन्याला सरासरी दोन हजार ते बावीसशे जमीन मोजणीची प्रकरणे निकाली निघणार आहेत.
जमिनीची अजूक आणि कमी वेळेत मोजणी करण्यासाठी भूमि अभिलेख विभागाने सर्व्हे ऑफ इंडियाच्या मदतीने राज्यात 77 ठिकाणी कॉर्स (कंन्टिन्यूस ऑपरेशन रेफरन्स स्टेशन) उभारले आहे. या कॉर्स आधारे जीपीएस रिडींग फक्त 30 सेंकदात घेता येते. कॉर्सचे रिडींग रोव्हर रिसिव्ह करणार असून हे रिडींग टॅबमध्ये दिसणार आहे. हे रोव्हर खरेदी करण्यासाठी पुणे जिल्हा नियोजन समितीकडून 2 कोटी 99 लाख रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला होता. यातून 35 रोव्हर खरेदी करण्यात आले आहे. यापूर्वी पहिल्या टप्प्यात 11 रोव्हर प्राप्त झाले. उर्वरित 24 रोव्हर जिल्हा अधिक्षक भूमि अभिलेख कार्यालयाला नुकतेच प्राप्त झाले आहेत. भूमि अभिलेख विभागाने 100 कर्मचाऱ्यांना रोव्हर वापरण्याचे प्रशिक्षण दिले आहे. एका रोव्हरमुळे दररोज चार ते पाच ठिकाणच्या मोजणी पूर्ण होणार आहे. “कॉर्स’ आधारे जीपीएस रिडींग फक्त 30 सेंकदात घेता येते. त्यामुळे मोजणीच्या कामासाठीचा कालावधी आणखी कमी झाला आहे.
पुणे जिल्ह्याला 35 रोव्हर मशिन प्राप्त झाल्या आहेत. त्यासाठी शंभर कर्मचाऱ्यांना या रोव्हरद्वारे मोजणी कशी करावी, याचे प्रशिक्षण देण्यात आले आहे. त्यामुळे मोजणीचे काम गतीमान आणि अधिक अचुक होण्यास मदत होणार आहे. एकदा मोजणी केल्यानंतर भविष्यात पुन्हा त्या जमिनीची मोजणीसाठी अर्ज केल्यानंतर मोजणीची गरज पडणार आहे. पैसे भरल्यानंतर कोर्डीनेटवरून मोजणीची प्रत लगेच उपलब्ध होण्यास मदत होणार आहे, अशी माहिती भूमि अभिलेख विभागाचे पुणे प्रदेशचे उपसंचालक किशोर तवरेज यांनी दिली.
जमीन मोजणीच्या यंत्रात झालेले बदल
प्लेन टेबल पद्धतीने लागणारा वेळ अर्धा ते एक दिवस
ईटीएस मशिनने मोजणी करण्यास लागणारा वेळ 2 ते 4 तास
रोव्हरच्या सहाय्याने मोजणीसाठी लागणारा वेळ 30 ते 35 मिनिटे