पाच लाख 74 हजार मिळकत धारकांना बिले पाठविण्यात येणार
पिंपरी – पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या करसंकलन विभागाच्या वतीने आज सोमवार (दि. 25) पासून 2022-23 या आर्थिक वर्षांतील मालमत्ता बिलांच्या वाटपाला सुरूवात करण्यात येणार आहे. यंदा कसंकलनाची बिले पोस्टाने पाठविण्यात येणार आहेत. यासाठी सुमारे 18 लाखांपेक्षा जास्त खर्च येणार असला तरी मिळकत धारकांना बिले वेळेत पोहोचविण्यासाठी प्रशासनाने कंबर कसली आहे.
पिंपरी-चिंचवड शहरातील चारही बाजूने दिवसेंदिवस मालमत्ता वाढत आहेत. महापालिका हद्दीत 5 लाख 74 हजार मिळकतींची नोंद आहे. गेल्या आर्थिक वर्षांत महापालिकेला मिळकत करापोटी 625 कोटींचा महसूल मिळाला आहे. त्यामुळे चालू आर्थिक वर्षांत कर संकलन विभागाला 950 कोटींचे उदिष्ट देण्यात आले आहे. तर या विभागाचे सहाय्यक आयुक्त नीलेश देशमुख यांनी 1 हजार कोटींचे उत्पन्न मिळविण्याचे टार्गेट ठेवले आहे. त्यानुसार कर संकलन विभाग आत्तापासूनच कामाला लागला आहे.
याबाबत माहिती देताना कर संकलन विभागाचे सहाय्यक आयुक्त नीलेश देशमुख म्हणाले, आज सोमवार (दि.25) रोजी मालमत्ता करांच्या बिलांचे वाटप करण्यास सुरूवात करण्यात येणार आहे. जेणेकरून मिळकत धारकांना लवकर बिले मिळतील. तसेच 30 जूनपर्यंत कर भरणाऱ्या नागरिकांना विविध सवलती आहेत.
या सवलतींचा लाभ घेता येईल. यंदा आकर्षक अशी बिले छापली आहेत. यामध्ये मालमत्ता धारकांना कोण-कोणते कर आहेत? याची सविस्तर आणि सुटसुटीत माहिती, सूचना दिल्या आहेत. तसेच महापालिकेची हेल्पलाईन असलेल्या सारथीचा हेल्पलाईन नंबर यामध्ये समाविष्ट केला आहे.
2200 नागरिकांनी काढला “ऑनलाइन ना हरकत दाखला’
मिळकत धारकांना विविध शासकीय कामासाठी मिळकत कराची थकबाकी नाही, असा दाखला महापालिकेकडून घेणे गरजेचे असते. हा दाखला आत्तापर्यंत ऑफलाइन घेण्याची सुविधा होती. त्यामुळे हा दाखला मिळविण्यासाठी नागरिकांना महापालिका आणि कर संकलन कार्यालयाकडे हेलपाटे मारावे लागत होते. त्यामुळे नागरिकांच्या सोईच्या दृष्टीने दोन महिन्यांपूर्वी महापालिकेने ना हरकत दाखला अवघ्या दहा रूपयात ऑनलाइन काढण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. अवघ्या दोन महिन्यात 2200 नागरिकांनी या सुविधेचा लाभ घेतला आहे.