जगभरात अत्यंत प्रतिष्ठित मानला जाणाऱ्या ऑस्कर 2022 च्या मंचावर अभिनेता विल स्मिथने कॉमेडियन ख्रिस रॉकच्या कानशिलात लगावली होती. याप्रकरणी विल स्मिथवर कारवाई करण्यात आली असून त्यास पुढील 10 वर्षे ऑस्कर सोहळ्यात उपस्थित राहता येणार नाही. विल स्मिथच्या या कृत्यामुळे त्याच्यावर 10 वर्षासाठी ही बंदी घालण्यात आली आहे.
याप्रकरणी हॉलिवूड फिल्म अकादमीने शुक्रवारी सांगितले की, ‘ऑस्करच्या मंचावर सूत्रसंचालक ख्रिस रॉकला थप्पड मारल्यानंतर त्यांच्या बोर्ड ऑफ गव्हर्नरने विल स्मिथला ऑस्करसह त्यांच्या कोणत्याही कार्यक्रमांवर उपस्थित राहण्यावर 10 वर्षांसाठी बंदी घातली आहे.’
94वा ऑस्कर सोहळा अनेकांसाठी खूप महत्त्वाचा होता. पण विल स्मिथच्या अस्वीकार्य वागण्याने त्यातील आनंदाचे क्षण धुळीस मिळाले. अॅकॅडमी ऑफ मोशन पिक्चर्स आर्ट्स अँड सायन्सेसचे अध्यक्ष डेव्हिड रुबिन आणि मुख्य कार्यकारी डॅन हडसन यांनी एका निवेदनात म्हटले आहे.
काय आहे नेमकं प्रकरण?
ऑस्कर 2022 पुरस्कार सोहळा तब्बल तीन वर्षांनंतर लॉस एंजिलिसमध्ये पार पडला. हा पुरस्कार सोहळा पार पडत असून दिग्गज कलाकारांनी या सोहळ्याला हजेरी लावली होती. या पुरस्कार सोहळ्यादरम्यान अभिनेता विल स्मिथची सूत्रसंचालक क्रिस रॉक याच्याशी बाचाबाची झाली. क्रिस रॉकने विलच्या पत्नीवर कमेंट केली. त्यामुळे भडकलेल्या विलने मंचावर जाऊन क्रिस रॉकच्या कानशिलात लगावली. G.I. Jane या चित्रपटावरून क्रिस रॉकने विल स्मिथची पत्नी जेडा पिंकेट स्मिथची खिल्ली उडवली. जेडाच्या टकलेवरून रॉकने मस्करी केली. जेडाला टक्कल असल्यामुळेच तिला चित्रपटातील भूमिका मिळाली, असं तो म्हणाला. पत्नीची केलेली ही मस्करी विस स्मिथला अजिबात आवडली नाही. तो भर पुरस्कार सोहळ्यात मंचावर गेला आणि क्रिसच्या कानशिलात लगावली.