मुंबई – संतप्त एसटी कर्मचाऱ्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या सिल्व्हर ओक निवासस्थानी आंदोलन केले. यावेळी कर्मचाऱ्यांनी चप्पला फेकल्या तसेच घोषणाबाजी केली. अचानक झालेल्या या आंदोलनामुळे पोलिसांची मोठी तारांबळ उडाली. यावर विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांनी प्रतिक्रिया दिली.
दरेकर म्हणाले की, एसटी कर्मचाऱ्यांना गेली पाच महिने दाबण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे ही परिस्थिती उद्भवली आहे. लढू किंवा मरू या स्थितीत कर्मचारी असल्याने कर्मचारी आक्रमक झाले आहेत. या सगळ्या परिस्थितीला महाविकास आघाडी सरकार कारणीभूत आहे.
पवार यांनी वेळोवेळी कर्मचाऱ्यांना सरकारमध्ये विलीनीकरण करण्याबाबत आश्वासन दिलं होतं. मात्र ते आश्वासन पाळलं गेलं नसल्याने एसटी कर्मचारी महाविकास आघाडीचे सर्वेसर्वा पवार साहेब यांच्या घरी गेले असतील असंही दरेकर यांनी म्हटलं.
नेमकं काय घडलं?
अनेक संपकरी ST कर्मचाऱ्यांनी शरद पवारांच्या घराकडे चप्पलफेक आणि दगडफेक केली. अचानक झालेल्या या आंदोलनामुळे सुरुवातीला निवासस्थानातील सुरक्षा कर्मचारी आणि पोलिसांनी संपकरी कर्मचाऱ्यांना अडवण्याचा खूप प्रयत्न केला. पण शेकडोच्या जमावासमोर त्यांचा निभाव लागला नाही.
दरम्यान आयपीएस अधिकारी विश्वास नांगरे पाटील यांच्यासह पोलिसांचा मोठा फौजफाटा सिल्व्हर ओकमध्ये दाखल झाला. या संपकरी कर्मचाऱ्यांमध्ये मोठ्या संख्येने महिलाही सहभागी झाल्या आहेत. त्या आपल्या हातील बांगड्या वाजवून सरकारविरोधात निषेध व्यक्त करत होत्या.