सातारा – महाराष्ट्र कुस्तीगिर परिषदेचे 64 वे सामने सातारा जिल्ह्यातील शहू स्टेडीयम या ठिकाणी होत आहेत. महाराष्ट्र केसरीच्या या स्पर्धेसाठी राज्यभरातील सुमारे 900 मल्लांनी सहभाग घेतला आहे. चार दिवसांपासून साताऱ्याच्या मातीत मल्लांनी आपली चुणूक दाखवली. ही स्पर्धा अंतिम टप्यात पोहचली आहे. मात्र अचानक सुरु झालेल्या अवकाळी पावसामुळे स्पर्धा पुढील सूचना मिळेपर्यंत स्थगित करण्यात आली आहे. महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेचे सरचिटणीस प्रा. बाळासाहेब लांडगे यांनी याबाबत माहिती दिली आहे.
दरम्यान, गतविजेत्या हर्षवर्धन सदगीर यांनी मॅट विभागाच्या उपांत्य फेरीत धडक मारली आहे. कोल्हापूरच्या गंगावेस तालमीचे माऊली जमदाडे आणि सिकंदर शेख मातीच्या उपांत्य फेरीत आमनेसामने असणार आहेत. बीडच्या अक्षय शिंदेसमोर मॅटवर कोल्हापूरच्या पृथ्वीराज पाटीलचं आव्हान असेल.
असे असतील उपांत्य फेरीचे सामने –
मॅट – १) हर्षवर्धन सदगीर (नाशिक) वि. हर्षद कोकाटे (पुणे) २) अक्षय शिंदे (बीड) वि. पृथ्वीराज पाटील (कोल्हापूर)
माती – १) माऊली जमदाडे (अमरावती) वि. सिकंदर शेख (वाशीम) २) प्रकाश बनकर (मुंबई) वि. महेंद्र गायकवाड (सोलापूर)
महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषद व सातारा तालीम संघ आयोजित महाराष्ट्र केसरी स्पर्धेला मंगळवारी (दि.5) संध्याकाळी सुरुवात झाली होती. पहिल्या दिवशी 57, 70 आणि 92 किलो वजनी गटातील कुस्त्या करून सुरुवात करण्यात आली होती.