पुणे – बनावट एनए ऑर्डर, भोगवटा प्रमाणपत्राच्या आधारे दस्त नोंदणी करण्याचा प्रकार दुय्यम निबंधक कार्यालय क्रमांक 3 मध्ये उघडकीस आला आहे. मागील पाच महिन्यांत या कार्यालयात तब्बल 112 दस्त हे बोगस कागदपत्रांच्या आधारे नोंदविल्याचे तपासणीत आढळून आले आहे. या प्रकरणाची गंभीर दखल नोंदणी व मुद्रांक विभागाने घेतली असून संबंधित अधिकाऱ्यावर निलंबनाची व फौजदारी गुन्हे दाखल करण्याची कारवाई केली जाणार आहे.
दुय्यम निबंधक कार्यालय क्रमांक 3 येथे मागील पाच महिन्यांत नोंदविलेल्या 1 हजार 472 दस्तांची तपासणी केली असता सुमारे 10 टक्के म्हणजे 112 इतके दस्त बोगस एनए ऑर्डर, बोगस भोगवटा प्रमाणपत्राच्या आधारे नोंदविण्यात आल्याचे आढळले. त्यामुळे बोगस कागदपत्रांच्या दस्तनोंदविणाऱ्यांवर गुन्हे दाखल करून त्या कार्यवाहीचा अहवाल सादर करण्याच्या सूचना नोंदणी विभागाने दिल्या आहेत. यानुसार बोगस कागदपत्रे दाखवून सदनिकांची खरेदीदार व विक्री करणारे यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची कार्यवाही सुरू केली आहे. सात प्रकरणांमध्ये तीन व्यक्तींवर हडपसर पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पालिका, पीएमआरडीए, जिल्हाधिकारी यांची परवानगी घेऊन बांधकाम केले असेल तसेच रेरा क्रमांक असेल तरच दस्तनोंदणी करता येते. मागील दोन वर्षांपासून अनधिकृत बांधकामांची दस्तनोंदणीस बंदी आहे. यामुळे अनेक अनधिकृत इमारतींमधील दस्तनोंदणी होत नाही. मात्र, बोगस कागदपत्रे सादर करून दस्तनोंदणी करण्याच्या प्रकार शहरात उघडकीस आला. बोगस एनए ऑर्डर बनवून त्या आधारे दस्तनोंदणी करण्यात येत होती. त्यासाठी अतिवरिष्ठ आयएएस अधिकाऱ्यांच्या नावे वापरून एनए ऑर्डर व भोगवटा प्रमाणपत्र बनविण्यात आले आहे.
बनावट कागदपत्रांच्या आधारे दस्त नोंदणी करणाऱ्या खरेदीदार-विक्री करणाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्याच्या सूचना दिल्या आहेत. याचसह संबधित दुय्यम निबंधकावर सुध्दा कारवाई केली जाणार आहे.- श्रावण हर्डीकर, राज्याचे नोंदणी महानिरीक्षक व मुद्रांक नियंत्रक