चाफळ – चाफळ, ता. पाटण येथील समर्थनगरात तीन घरांना रविवारी पहाटे 4 वाजण्याच्या सुमारास अचानक लागलेल्या आगीत धान्य व संसारोपयोग साहित्य जळून दोन लाख रुपयांचे नुकसान झाले. ग्रामस्थांनी नळयोजनेचे पाणी तातडीने सोडून आणि मिळेल त्या घरातून पाणी आणून आग आटोक्यात आणल्याने मोठा अनर्थ टळला. सुदैवाने या आगीत कोणतीही जीवितहानी झाली नाही. नागरिकांच्या अथक परिश्रमानंतर आग आटोक्यात आली.
याबाबत घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी, चाफळ येथील समर्थनगरमधील बबन अंतू साळुंखे यांच्या घराला रविवारी पहाटे 4 वाजता अचानक आग लागली. त्यांच्या शेजारी असलेल्या अशोक पांडुरंग साळुंखे, हणमंत खाशाबा साळुंखे यांच्या घरांनादेखील आगीची झळ लागल्याने मोठे नुकसान झाले.
काही क्षणातच आगीने रौद्ररूप धारण केले. या आगीत चार बॅरल गहू, तांदूळ, ज्वारी, कडधान्य, इतर संसारोपयोग साहित्य, सायकल, गवत, लाकूड, शेतीची अवजारे, पंप जळून सुमारे दोन लाख रुपयांचे नुकसान झाले. ग्रामस्थांनी पाणी आणून आग आटोक्यात आणल्याने आजूबाजूला असलेल्या घरांना आगीची झळ बसली नाही. शासनाने जळीतग्रस्तांना तातडीने मदत द्यावी, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.