खडकवासला -खडकवासला धरणात मित्रांबरोबर मस्ती करत पोहताना पाण्याचा अंदाज न आल्याने एका तरुणाचा बुडून मृत्यू झाला. ही घटना रविवारी दुपारी साडेतीनच्या सुमारास घडली. गेल्या दोन दिवसांपासून पाणलोट क्षेत्रात बुडीतसत्र सुरूच आहे. त्यामुळे धरण सुरक्षा रक्षकांनी प्रभावी उपायोजना राबविण्याची मागणी जोर धरू लागली आहे.
योगेश नवनाथ नवले (वय 18, रा. बिबवेवाडी, पुणे), असे बुडून मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे. याबाबत घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार, योगेश हा मूळचा अहमदनगरच्या राशिन येथील असून तो योगेश कामासाठी पुण्यात आलेला होता. तो रविवार पेठेतील एका दुकानात कामाला होता. रविवार सुट्टी असल्याने तो त्याच्या इतर चार मित्रांसह खडकवासला धरणात पोहोण्यासाठी आला होता. योगेश व इतर चौघे चौपाटीजवळ खडकवासला धरणात उतरले. पाचही मित्रांची मिळून पाण्यात हुल्लडबाजी सुरू होती.
मित्रांनी बाहेर आल्यावर अंगाला माती लावल्याने योगेश अंग धुण्यासाठी पुन्हा पाण्यात उतरला. त्यानंतर तो पाण्यात गायब झाला. योगेश दिसेना म्हणून इतर मित्रांनी मदतीसाठी आरडाओरडा केला. तेथून जवळच असलेले वाहतूक पोलीस हवालदार विलास बांबळे, कॉन्स्टेबल मकसूद सय्यद, होमगार्ड शांताराम राठोड, प्रवीण घुले व विजय भालेराव यांनी घटनास्थळी धाव घेतली.
हवेली पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक यशवंत नलावडे यांनी अग्निशमन दलाला पाचारण केले. अग्निशमन केंद्र प्रमुख सुजित पाटील यांच्या नेतृत्वाखाली ओंकार इंगवले, पंकज माळी, योगेश मायनाळे,सुरज इंगवले व अक्षय काळे या जवानांनी योगेशचा मृतदेह शोधून पाण्याबाहेर काढला. मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी ससून रुग्णालयात पाठविला आहे.
दोन दिवसांत तीनजणांनी मृत्यूला कवटाळले
शनिवार (दि.2) पुण्यातील दोन तरूणाचा बुडून मृत्यू झाला. ही घटना होऊन 72 तास उलटूपर्यंत (दि.3) एकजण खडकवासला धरणात बुडून मृत्यू झाला. दोन दिवसांत तीनजणांनी मृत्यूला कवटाळले आहेत. धरणाच्या सुरक्षेसाठी खासगी सुरक्षा रक्षक तैनात केले आहेत. दरम्यान, मासे पकडण्यासाठी, पोहण्यासाठी मद्य प्राशन करण्यासाठी येतात. त्यांच्यावर कारवाई होत नाहीत. तरुणांना सुरक्षारक्षकांनी वेळीच हटकले असते तर ही दुर्घटना घडली नसती, अशी प्रतिक्रिया उमटत आहेत.