नवी दिल्ली – दुबई दौऱ्याच्या दुसऱ्या दिवशी, केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांच्या हस्ते सोमवारी(दि.28) दुबई एक्स्पोमध्ये तेजस (अमिरातीमधील रोजगार आणि कौशल्यांसाठी प्रशिक्षण) कौशल्य प्रकल्पाचा आरंभ करण्यात आला.
केंद्रीय मंत्री ठाकूर म्हणाले की, परदेशातील भारतीयांना प्रशिक्षित करण्यासाठी हा एक स्किल इंडिया आंतरराष्ट्रीय प्रकल्प आहे. भारतीयांना कौशल्य प्रशिक्षण, प्रमाणीकरण आणि परदेशात नोकरी मिळवून देणे हे या प्रकल्पाचे उद्दिष्ट आहे. संयुक्त अरब अमिरातीमधील कौशल्य आणि बाजाराच्या गरजा पूर्ण करण्याच्या अनुषंगाने भारतीय कामगारांना सक्षम बनवणे हे तेजस प्रकल्पाचे उद्दिष्ट आहे.
भारत हा तरुणाईची लोकसंख्या असलेला देश आहे. देश उभारणी आणि प्रतिमा निर्मितीत तरुण हे सर्वात मोठे हितधारक आहेत,असे केंद्रीय मंत्री ठाकूर यांनी उपस्थितांना संबोधित करताना सांगितले. या लोकसंख्येचा कौशल्य विकास आणि भारताकडून जगाला कुशल मनुष्यबळ उपलब्ध करून देणे यावर आम्ही लक्ष केंद्रित केले आहे, असे केंद्रीय मंत्री ठाकूर म्हणाले.
भारत आणि संयुक्त अरब अमिराती यांच्यातील दृढ भागीदारीच्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दृष्टिकोनाचा ठाकूर यांनी पुनरुच्चार केला.सुरुवातीच्या टप्प्यात संयुक्त अरब अमिरातीमध्ये 10,000 कुशल भारतीय मनुष्यबळ तयार करण्याचे तेजसचे उद्दिष्ट आहे. यावेळी केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांनी भारत आणि संयुक्त अरब अमिरातीमधील चित्रपट आणि मनोरंजन क्षेत्रातील उद्योजकांशी चर्चाही केली.