केपटाऊन – दक्षिण आफ्रिकेच्या क्रिकेटपटूंनी मायदेशात बांगलादेशविरुद्ध होत असलेल्या मालिकेत खेळण्यास नकार दिला असून आयपीएल स्पर्धेलाच प्राधान्य दिल्याचे स्पष्ट जाले आहे. दक्षिण आफ्रिका क्रिकेट मंडळ व प्रशिक्षकांनी केलेल्या विनंतीला केराची टोपली दाखवत त्यांचे सर्व प्रमुख खेळाडू आयपीएल स्पर्धेसाठी भारतात दाखल झाले आहेत.
दक्षिण आफ्रिका क्रिकेट संघ मायदेशात बांगलादेशविरुद्ध दोन सामन्यांची कसोटी मालिका खेळणार आहे. या मालिकेसाठी दक्षिण आफ्रिका आपला दुय्यम संघ उतरवण्याची शक्यता आहे. संघातील जवळपास सहा ते सात खेळाडू आयपीएलच्या विविध संघाशी करारबद्ध झाले आहेत. स्पर्धेच्या यंदाच्या मोसमाला येत्या 26 मार्चपासून सुरुवात होत आहे.
दक्षिण आफ्रिकेच्या कसोटी संघाचा कर्णधार डीन एल्गरने खेळाडूंच्या या निर्णयावर टीका केली आहे. दक्षिण आफ्रिकेचे खेळाडू राष्ट्रीय संघासाठी खेळायचे की आयपीएलला पसंती देतात, ही त्यांच्या निष्ठेची चाचणी असेल, असेही त्याने म्हटले आहे.
बीसीसीआयसोबत झालेल्या करारानुसार आम्ही आमच्या खेळाडूंना आयपीएलसाठी परवानगी देत आहोत. मात्र, प्रमुख खेळाडूंनी देशाकडून खेळण्याला प्राधान्य दिले पाहिजे. संघातील सर्व कसोटी तज्ज्ञांची प्रशिक्षक मार्क बाउचर यांच्याशी बैठक झाली असून, खेळाडूंना कसोटीला प्राधान्य देण्यासाठी पटवून देण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे, असेही त्याने सांगितले.