नवी दिल्ली : दक्षिण आफ्रिकेतून आणलेल्या आणखी एका चित्त्याचा मध्य प्रदेशातील कुनो नॅशनल पार्कमध्ये मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. रविवारी चार वाजण्याच्या सुमारास चित्त्याचा मृत्यू झाला असल्याचे सांगण्यात येत आहे. वनविभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी याबाबतची माहिती दिली असून मृत्युमुखी पडलेल्या चित्याचे ‘उदय’ असे नाव आहे.
मागील दोन महिन्यात कुनो नॅशनल पार्कमध्ये दुसऱ्या चित्त्याचा मृत्यू झाला आहे. काही दिवसांपूर्वी कुनो पार्कमध्ये मादी चित्ता साशा हिचा मृत्यू झाला होता. त्यानंतर आता उदय या चित्त्याचा मृत्यू झाला आहे. वन विभागाच्या अधिकाऱ्यांना दिलेल्या माहितीनुसार, रविवारी सकाळी नऊ वाजण्याच्या सुमारास चित्ता उदय मान खाली घालून जमिनीवर पडलेला दिसून आला. त्याच्याजवळ गेल्यानंतर तो लंगडत चालताना दिसला. त्यानंतर याची सूचना वन्यप्राणी चिकित्सकांना देण्यात आली. त्यानंतर उदयची तपासणी केल्यानंतर तो आजारी असल्याचे दिसून आले.
Madhya Pradesh | Another Cheetah, Uday, who was brought from South Africa, has died during treatment after falling ill at Kuno National Park. Reason for death is yet to be ascertained: MP Chief Conservator of Forest JS Chauhan pic.twitter.com/2IHPMCji2L
— ANI (@ANI) April 23, 2023
उदयला उपचारासाठी ट्रॅकुलाइज केले. त्यानंतर बेशुद्ध करुन त्याच्यावर उपचार सुरु केले होते. मात्र, उदयची प्रकृती पाहून त्याला पुढील उपाचर आणि निरीक्षणासाठी आयसोलेशन वार्डात ठेवलं होतं. मात्र रविवारी चार वाजण्याच्या सुमारास उदयचा मृत्यू झाला. दरम्यान, उदय या चित्त्याचा मृत्यू नेमका कशामुळं झाला याबाबतची माहिती अद्याप मिळाली नाही. शवविच्छेदन अहवाल आल्यानंतर याबाबतची माहिती मिळू शकेल असे प्रधान मुख्य वनसंरक्षक जे. एस. चौहान यांनी सांगितले.
दक्षिण आफ्रिकेतून भारतात आणलेल्या 20 चित्त्यांपैकी आता 18 चित्ते उरले आहेत. दक्षिण आफ्रिकेतून आणलेल्या आठ चित्त्यांना गेल्या वर्षी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते त्यांच्या वाढदिवसानिमित्त कुनो राष्ट्रीय उद्यानात सोडण्यात आले होतं. यातील दोन चित्त्यांचा आत्तापर्यंत मृत्यू झाला आहे.