पुणे – उन्हाळ्याच्या पार्श्वभूमीवर खाद्य बर्फ, शीतपेये, ज्यूस, सरबत, उसाचा रस या सगळ्या पेयांची अन्न आणि औषध प्रशासनाकडून (एफडीए) कडून तपासणी होणार आहे. यासाठी विशेष मोहीम राबवण्यात येणार आहे.
उन्हाळ्यात नागरिक शीतपेये, सरबत, लस्सी, बर्फ गोळा, नीरा, ताक, ज्यूस, आईस्क्रीम, कोल्ड्रिंक्सचे सेवन करताना दिसून येतात.
या काळात या सगळ्यांमध्ये बर्फाचा वापर वाढतो. या ठिकाणचा बर्फ आणि कच्चा माल तसेच तयार अन्नपदार्थाचा दर्जा याची खातरजमा करणे आवश्यक असते. त्यासाठी आता विशेष मोहीम राबवण्यात येणार आहे. त्यामध्ये या पदार्थांच्या तपासण्या करून त्याचे नमुने प्रयोगशाळेत विश्लेषणासाठी पाठवण्यात येणार आहेत.
बर्फाबाबत ही काळजी घ्यावी
बर्फाचे उत्पादन करताना खाद्य दर्जाच्या बर्फ हा पिण्यायोग्य पाण्यापासूनच तयार करावा. तो रंगहीन असावा.
अखाद्य बर्फात इंडिगो कारमाइन किंवा ब्रिलियंट ब्लू एफसीएफ रंग अत्यल्प प्रमाणात निळसर रंगाची छटा निर्माण होईल एवढा खाद्यरंग टाकावा.
खाद्य बर्फ विक्री आणि खाद्यपदार्थात वापरण्यात येणारा बर्फ, बर्फ उत्पादक, साठा, वितरण, वाहतूक आणि विक्री यावरील उल्लंघन करणाऱ्या आस्थापनांविरुद्ध कायदेशीर कारवाई होईल.
खाद्यबर्फ हा परवानाधारक, नोंदणीधारक व्यावसायिकाकडूनच खरेदी करावा. नागरिकांनी या पदार्थांचे सेवन करताना विक्रेत्यांकडे खाद्यबर्फच असल्याची खात्री करावी.
– शिवाजी देसाई, सहआयुक्त, “एफडीए’