नगर – चंदनतस्करी करणाऱ्या नगर तालुक्यातील चिचोंडी पाटील येथील दोघांच्या कोतवाली पोलिसांनी मुसक्या आवळल्या. त्यांच्याकडून 370 किलो चंदनाचे लाकूड जप्त करण्यात आले. 18 लाख 96 हजाराच्या मुद्देमालासह सुभाष दिलवाले आणि राजेंद्र सासवडे या दोन आरोपींना अटक करण्यात आली.
चंदनाचे वृक्ष तोडण्यास बंदी असतांना चंदनाचे वृक्ष तोडून लाकडाचे तुकडे इनोव्हामधून नगर शहरमार्गे तस्करी करणार असल्याची माहिती कोतवाली पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक संपत शिंदे यांना मिळाल्यानंतर गुन्हे शोध पथकातील पोलिसांनी सापळा लावण्यास सांगितले. चांदणी चौक ते जुने जिल्हाधिकारी कार्यालयाकडे जाणाऱ्या रस्त्यावर सैनिक लॉन गेट समोरच्या परिसरात पहाटे साडेतीनच्या सुमारास इनोव्हा गाडी येताना दिसली. गाडी थांबवून तपासणी केली असता गाडीतून 11 लाख 84 हजारांचे 370 किलो चंदनाचे लाकूड जप्त करण्यात आले.
गाडीचा मालक सुभाष भिमराज दिलवाले आणि राजेंद्र रंगनाथ सासवडे (दोघे रा.चिचोंडी पाटील) या दोघांना अटक करण्यात आली. त्यांच्याकडून दोन मोबाईल, रोख रक्कम 2900, इनोव्हा गाडीसह 370 किलो चंदन असा मिळून 18 लाख 96 हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. पोलिस नाईक योगेश भिंगारदिवे यांच्या फिर्यादीवरून दिलवाले आणि सासवडे या दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.