नवी दिल्ली – रशियाच्या युक्रेनवरील हल्ल्यामुळे जागतिक वित्तीय व्यवस्था अस्ताव्यस्त झाली आहे. त्यामुळे लोक सुरक्षित गुंतवणूकिकडे वळत आहेत. परिणामी डॉलरचा भाव वाढत असून सोने आणि चांदीच्या दरातही मोठी वाढ नोंदली गेली आहे. जर परिस्थिती फारच बिघडली तर सोने आणि चांदीचे दर मोठ्या प्रमाणात वाढू शकतात असे एचडीएफसी सिक्युरिटीज या संस्थेने म्हटले आहे.
जागतिक बाजारात सोन्याचे दर वाढण्याबरोबरच भारतीय सराफात सोन्याचा दर गुरुवारी 1,656 रुपयानी वाढून 51,627 रुपये प्रति 10 ग्रॅम या पातळीवर गेला. त्याचबरोबर तयार चांदीचा दर 2,350 रुपयांनी वाढून 66,267 रुपये प्रति किलो या पातळीवर गेला.
भारतीय रुपया गुरुवारी 109 पैशांनी कोसळल्यानंतर सोने आणि चांदीची आयात महागात पडते. त्यामुळे भारतीय सराफात सोने आणि चांदीचे दर मोठ्या प्रमाणात वाढले असल्याचे दिसून येते. भारतीय आणि युरोपियन बाजारातही सोने आणि चांदीचे दर वेगाने वाढत असल्याचे एचडीएफसी सिक्युरिटीज या संस्थेचे विश्लेषक तपन पटेल यांनी सांगितले.
अगोदरच जागतिक पातळीवर महागाई वाढत असल्यामुळे सोन्याची खरेदी वाढत होती. आता युध्दामुळे जागतिक महागाई आणखी वाढून चलनाची किंमत कमी होत आहे. त्यामुळे बरेच गुंतवणूकदार सोने खरेदी करून आपली गुंतवणूक युद्धाच्या काळात सुरक्षित ठेवण्याचा प्रयत्न करीत आहेत. जागतिक बाजारात सोन्याचा दर वाढून 1,942 प्रति औंस झाला. तर चांदीचा दर 25.07 डॉलर प्रति औंस या पातळीवर गेला.
जर युध्द वाढले तर सोन्याची आयात ठप्प होण्याची शक्यता आहे. अशा अवस्थेमध्ये सोन्याचे दर आणखी वाढू शकतात अशी भीती व्यक्त करण्यात येत आहे. त्यामुळे दागिन्यासाठी किंवा वापरासाठी सोने खरेदी थांबेल. मात्र गुंतवणुकीसाठी काही गुंतवणूकदार सोने खरेदी करण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.