उद्घाटनांची संधी साधत भाजप फोडणार प्रचाराचा नारळ
पुणे – महापालिका निवडणुकांच्या तोंडावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा पुणे दौरा जवळपास निश्चित झाला आहे. दि. 6 किंवा 8 मार्च रोजी हा दौरा होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. दरम्यान, या दौऱ्यासाठी तयारी करण्याच्या सूचना विधानसभेचे विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी महापालिका पदाधिकाऱ्यांना दिल्या आहेत.
या एका दिवसाच्या दौऱ्यात पंतप्रधानांच्या हस्ते संगमवाडी ते बंडगार्डन नदीकाठ सुधार प्रकल्पाचे भूमिपूजन, पंतप्रधान आवाज योजनेतील 1 हजार घरांची लॉटरी, पीएमपीच्या 70 ई-बसेसचे लोकार्पण, आर. के. लक्ष्मण आर्ट गॅलरी आणि महापालिकेतील छत्रपती शिवाजी महाराज स्मारकाचे उद्घाटन अशा वेगवेगळ्या कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. तर, या दौऱ्यानिमित्त पंतप्रधानांची जाहीर सभा घेऊन प्रचाराचा नारळ फोडण्याचे नियोजनही भाजपकडून सुरू आहे.
महापालिका सभागृहाची मुदत 14 मार्च रोजी संपत असल्याने निवडणुका लवकरच होण्याची चिन्हे आहेत. त्यामुळे भाजपने जानेवारीतच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते मेट्रो, जायका-नदीसुधार प्रकल्पाचे उद्घाटन करण्याचे नियोजन केले होते. दि.28 जानेवारीला दौराही निश्चित झाला होता. मात्र, करोना तसेच इतर काही कारणास्तव हा दौरा रद्द करण्यात आला होता.
त्यानंतर आता पंतप्रधानांच्या दौऱ्याला मुहूर्त लागला असून भाजपसाठी निवडणूकांच्या तोंडावर होणारा हा दौरा महत्वाचा मानला जात आहे. दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या दौऱ्यांबाबत महापौर मुरलीधर मोहोळ यांनीही दुजोरा दिला आहे, मात्र, तारीख अद्याप अनिश्चित असल्याचे महापौर म्हणाले.