सांगली – जम्मू-काश्मीरमधील शोपियाँमध्ये सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये झालेल्या चकमकीत सांगली जिल्ह्यातील वाळवा तालुक्यातील शिगाव येथील जवान रोहित तानाजी चव्हाण (वय 23) शहीद झाले. दहशतवाद्यांशी लढा देत असताना जवान रोहित यांना वीरमरण आले. रविवारी (दि. 20) दुपारनंतर जवान रोमित यांचे पार्थिव शिगाव येथे पोहचण्याची शक्यता आहे. त्याच्यावर वारणा नदी काठी शासकीय इतमामात अंत्यसंस्कार होणार आहे.
जैनापुरातील चेरमार्ग भागात दहशतवादी लपले असल्याची माहिती सुरक्षा जवानांना मिळाली होती. यानंतर परिसराची घेराबंदी करून सर्च ऑपरेशन सुरू केले होते. याच दरम्यान दहशतवाद्यांनी जवानांवर गोळीबार सुरु केला. सुरक्षा जवानांनी त्याला चोख प्रत्युत्तर दिले, त्यामध्ये एक दहशतवादी ठार झाला. पण राष्ट्रीय रायफलमध्ये तैनात असलेले शिगाव गावचे सुपुत्र रोहित तानाजी चव्हाण तसेच संतोष यादव हे दोघे जवान शहीद झाले.
रोहित पाच वर्षांपूर्वी भारतीय सेनेमध्ये भरती झाले होते. त्यांचे प्राथमिक शिक्षण शिगाव येथील जिल्हा परिषद मराठी शाळा येथे तर, माध्यमिक शिक्षण रामचंद्र चंद्रोजी बारवडे विद्यालयात झाले होते. उच्च शिक्षण बळवंतराव यादव महाविद्यालय पेठवडगाव येथे झाले. बारावी पास झाल्यानंतर ते भारतीय सैनिक दलामध्ये भरती झाले होते. रोहित यांचे वडील तानाजी चव्हाण हे राजारामबापू पाटील साखर कारखान्यामध्ये कार्यरत आहेत. रोहित त्यांच्या पश्चात वडील, आई व एक बहीण असा परिवार आहे.