नवी दिल्ली : मध्य प्रदेशामध्ये एका अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. रीवा जिल्ह्यात १७ वर्षीय आदिवासी मुलीचे अपहरण करून तिच्यावर सामूहिक बलात्कार करण्यात आला असल्याचे माहिती उघड झाली आहे. आरोपींनी तिचा चेहराही दाताने चावला, इतकी क्रूरता आरोपींनी पीडितेवर केली. ही घटना रविवारी रात्री घडल्याचे पोलिसांनी सांगितले. तीन आरोपींपैकी दोघे जण अल्पवयीन आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडिता तिच्या चुलत भावासोबत जत्रेतून घरी परतत असताना तीन आरोपींनी तिचे अपहरण केले. त्यानंतर त्यांनी तिला निर्जन जंगलात नेऊन तिच्यावर बलात्कार केला. रविवारी मध्यरात्रीच्या सुमारास पीडिता पळून जाण्यात यशस्वी झाली आणि तिच्या नातेवाईकाच्या घरी पोहोचली. सोमवारी तिच्या कुटुंबीयांनी पोलिसांत तक्रार दाखल केली. या प्रकरणात मुख्य आरोपी असलेल्या २२ वर्षीय तरुणाला आणि १६ आणि १७ वर्षांच्या दोन अल्पवयीन मुलांना पोलिसांनी अटक केली आहे.
पोलिस अधिकाऱ्याने सांगितले की, मुलीच्या वैद्यकीय अहवालात तिच्यावर बलात्कार झाल्याचे स्पष्ट झाले आहे. दरम्यान, तिन्ही आरोपी आणि पीडिता एकाच आदिवासी समाजातील आहेत. घटनेनंतर मुलीच्या कुटुंबीयांनी मुख्य आरोपीला पीडितेशी लग्न करण्यास सांगितले, मात्र त्याने नकार दिला. त्याने नकार दिल्यानंतर पीडितेच्या कुटुंबीयांनी पोलिसात तक्रार दाखल केली, असे अधिकाऱ्याने सांगितले.
तिन्ही आरोपींवर भारतीय दंड संहितेच्या संबंधित कलमांतर्गत सामूहिक बलात्कार, अपहरण, पीडितेला त्रास देणे आणि धमकावणे, तसेच पॉस्को या तरतुदींनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.