मुंबई – प्रसिद्ध दिग्दर्शक नागराज मंजुळेचा झुंड चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. बॉलिवूडचे महानायक अभिनेते अमिताभ बच्चन यांची मुख्य भूमिका असणाऱ्या ‘झुंड’ या चित्रपटाचा टीझर आज मंगळवार रोजी प्रदर्शित झाला आहे. हा टीझर प्रदर्शित होताच याला मोठा प्रतिसाद मिळाला आहे. काही वेळातच हा टीझर लाखो लोकांनी बघीतला आहे. विशेष म्हणजे या टीझरमधील अमिताभ बच्चन यांच्या लूकने अनेकांचे लक्ष वेधले आहे.
झुंड च्या या टीझर मध्ये अमिताभ बच्चन हे प्रशिक्षकाच्या भूमिकेमध्ये दिसत आहेत. त्यांचा ‘अँग्री यंग मॅन’ अंदाज या चित्रपटामधून पुन्हा प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे, असा अंदाज अनेकांनी टीझर पाहून लावला आहे. टीझरमध्ये अमिताभ यांच्यासोबतच काही लहान मुलांची टीम देखील दिसत आहेत. दिग्दर्शक नागराज मंजुळे यांनी टीझर शेअर केला आहे.
सैराटच्या तुफान यशानंतर नागराजचा ‘झुंड’ हा हिंदी चित्रपट 4 मार्च रोजी मोठ्या पडद्यावर पदर्शित होणार आहे. लॉकडाऊनमुळे या चित्रपटाच्या चित्रीकरणासाठी अनेक अडचणी आल्या होत्या गेल्या वर्षी 18 जून रोजी हा चित्रपट प्रदर्शित होणार होता पण नंतर या चित्रपटाची रिलीज डेट पुढे ढकलण्यात आली.