कोलार (कर्नाटक) – कर्नाटकच्या कोलार जिल्ह्यात वर्गात मुस्लीम विद्यार्थ्यांना नमाज पठण करण्यास परवानगी दिल्याने हिंदुत्ववादी संघटनांनी त्याला जोरदार विरोध केला. या पार्श्वभूमीवर त्या मुख्याध्यापिकेला सेवेतून निलंबित करण्यात आले.
मुलबगल सोमेश्वर पाल्य बाले चंगप्पा गव्हर्मेंट कन्नड मॉडेल हायर प्रायमरी स्कूलमध्ये काही विद्यार्थी नमाज पठण करत असल्याचा व्हिडिओ शुक्रवारी व्हायरल झाला होता. त्यानंतर रविवारी तेथे हिंदुत्ववादी संघटनांच्या कार्यकर्त्यांनी घुसून आंदोलन केले. त्यानंतर कोलार जिल्हा प्रशासनाने या प्रकरणाच्या चौकशीचे आदेश दिले. त्यानंतर जिल्हा शिक्षणाधिकारी गिरीजेश्वरी देवी यांनी मुख्याध्यापक उमादेवी यांना निलंबित करण्याचे दिले.
वर्गात शुक्रवारी नमाज पठण करण्याची परवानगी देण्याची चूक मुख्याध्यापिकेने केल्याचे आम्ही शाळेत पाठवलेल्या चार सदस्यीय मंडळाला आढळून आले. त्यामुळे त्यांना निलंबित करण्याचे आदेश देण्यात आले, असे गिरिजेश्वरीदेवी यांनी सांगितले.