पुणे –राज्याच्या आरोग्य विभागाकडे नोंदणी न केलेले तसेच ज्या विषयात पदवी घेतली आहे, त्या व्यतिरिक्त उपचार करणाऱ्या 45 डॉक्टरांविरुद्ध पुणे महापालिकेने आतापर्यंत 46 गुन्हे दाखल केले आहेत.
राज्य सरकारच्या आदेशानुसार 2017 पासून महापालिकेने बोगस डॉक्टरांविरोधात मोहीम सुरू केली आहे. यामध्ये प्रामुख्याने इतर राज्यांत वैद्यक उपचारांची पदवी घेतलेले परंतु राज्याच्या मेडीकल कौन्सिलकडे नोंदणी अथवा नोंदणीचे नूतनीकरण न करताच उपचार करणारे, मान्यताप्राप्त नसलेल्या औषधे देणारे तसेच ज्या विषयात पदवी घेतली आहे, त्या व्यतिरिक्त अन्य उपचार अथवा शस्त्रक्रिया करणाऱ्या डॉक्टरांचा शोध घेण्यासाठी ही मोहीम राबवण्यात येत आहे.
पुणे महापालिकास्तरावर महापालिका आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली यासाठी समिती स्थापन करण्यात आली आहे. त्यामध्ये महापालिकेचे आरोग्य प्रमुख आणि सह आरोग्य प्रमुख यांच्यासह शासकिय आणि अशासकिय सदस्यांचा समावेश आहे. नागरिकांकडून डॉक्टरांसंदर्भात येणाऱ्या तक्रारी या समितीपुढे ठेवण्यात येतात. तक्रारीनुसार संबंधित डॉक्टरांच्या पदव्यांची कागदपत्रे, मेडिकल कौन्सिलकडील नोंदणी, नूतनीकरण आदी बाबींची माहिती घेतली जाते. तक्रारीनुसार पडताळणी करून महापालिकेच्या विधी विभागाकडून फेरतपासणी आणि अभिप्राय घेऊन संबंधित पोलीस ठाण्यात क्षेत्रीय मेडिकल ऑफिसरच्या माध्यमातून गुन्हा दाखल करण्यात येतो.
आतापर्यंत 45 डॉक्टरांविरोधात 46 गुन्हे दाखल करण्यात आले आहे. यापैकी एका डॉक्टरविरोधात दोनवेळा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. समितीची बैठक तीन महिन्यांतून एकदा बोलवण्यात येते. नुकतीच समितीची बैठक झाली असून, त्यामध्ये कारवाईबाबत आढावा घेण्यात आला. – डॉ. कल्पना बळीवंत, सह आरोग्यप्रमुख, पुणे महापालिका