पुणे – व्यवसाय शिक्षण आणि प्रशिक्षण संचालनालयाच्या अधिपत्याखालील प्रादेशिक कार्यालयाअंतर्गत शिक्षकीय संवर्गातील सातशे पदांची भरती करण्यास राज्य शासनाने मंजुरी दिली आहे. पुणे, मुंबई, नाशिक, औरंगाबाद, अमरावती, नागपूर येथील एकूण सातशे पदे सरळसेवेद्वारे भरली जाणार आहेत.
यासंदर्भात कौशल्य विकास, रोजगार आणि उद्योगकता विभागाने शासन निर्णय प्रसिद्ध केला आहे. व्यवसाय शिक्षण आणि प्रशिक्षण संचालनालयाअंतर्गत राज्यात 7 हजार 396 नियमित शिक्षकीय पदे मंजूर आहेत. त्यापैकी 2 हजार 363 पदे रिक्त आहेत. कंत्राटी तत्त्वावरील एक हजार 500 पदांपैकी 1 हजार 901 पदे रिक्त आहेत.
औद्योगिक प्रशिक्षण संस्थांतील जास्त मागणी असलेल्या अभ्यासक्रमांची रिक्त पदे भरण्यासाठी संबंधित अभ्यासक्रमांसाठीची उपलब्ध यंत्रसामुग्री, स्कील गॅप धोरणानुसार पदाची आवश्यकता आदी बाबी विचारात घेऊन सरळसेवेच्या कोट्यातील 1 हजार 203 पदे भरण्याचा प्रस्ताव देण्यात आला होता. त्यातील शिक्षकीय संवर्गातील (निदेशक) सातशे पदांची सरळसेवा कोट्यातून भरती करण्यास शासन नियुक्ती उपसमितीने मान्यता दिली.
त्यात संचालनालयाच्या प्रादेशिक कार्यालयांनुसार मुंबईमध्ये 187, पुण्यामध्ये 108, नाशिकमध्ये 101, औरंगाबादमध्ये 107, अमरावतीमध्ये 85, नागपूरमध्ये 112 अशी सातशे पदे भरण्यास मान्यता देण्यात आहे.