नवी दिल्ली – यंदा 26 जानेवारीचा प्रजासत्ताक दिन सोहळा अद्भुत व अभूतपूर्व होणार आहे. स्वातंत्र्याच्या 75व्या वर्षात होणाऱ्या या समारंभाचे सर्वात मोठे वैशिष्ट्य असलेल्या परेडचे आयोजन नव्या राजपथावर होईल. सेंट्रल व्हिस्टा प्रकल्पांतर्गत विजय चौकातून इंडिया गेटपर्यंत राजपथाच्या पुनर्विकासाचे काम होत असून ते शेवटच्या टप्प्यात आहे.
विशेष म्हणजे, पहिल्यांदाच देशभरातून स्पर्धेंतर्गत निवडलेले व्यावसायिक कलाकार यंदा राजपथावर उतरतील. तंत्रज्ञान, स्वदेशी व नावीन्याचा समावेश करण्यासाठी “ड्रोन परेड’चा सर्वात अनोखा समावेश झाला आहे. यामुळे ही परेड संस्मरणीय होणार आहे. संरक्षण प्रतिष्ठानच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, यंदा प्रजासत्ताक दिनाच्या परेडमध्ये चार मोठे कार्यक्रम घेण्यात आले आहेत.
संरक्षण मंत्रालयानुसार, सेंट्रल व्हिस्टा प्रोजेक्टअंतर्गत परेडसाठी आवश्यक भाग – राजपथ, लॉन, कालवा, पार्किंग एरिया व इतर जागांची उभारणी पूर्ण झाली आहे. 4 अंडरपास आणि 8 जनसुविधा केंद्र विकसित होणार होते. मात्र त्यांचे काम पूर्ण होऊ शकलेले नाही. ते परेडनंतर सुरू राहील. राजपथावर लॉन व कालव्याच्या किनारी नवे लाइट पोल लावले आहे.
परेडदरम्यान व्हीआयपी रहदारी सुरळीत ठेवण्यासाठी कालव्यांवर 16 पक्के पूल उभारले आहेत. शुक्रवारपासून नव्या राजपथावर टप्प्यांत सराव सुरू केली जाईल. 20 आणि 21 जानेवारीला रंगीत तालीम होईल. 23 जानेवारीला पहिली फुल ड्रेस रिहर्सल होईल. वाढत्या करोना रुग्णांच्या पार्श्वभूमीवर राजपथावर किती प्रेक्षकांना परवानगी दिली जाईल, याचा निर्णय झालेला नाही.
परेडमध्ये शानदार प्रस्तुती
राजपथावर प्रोफेशनल डान्स ट्रूप्सचेही शो होतील. वंदे मातरम स्पर्धेअंतर्गत 323 ग्रुप्सच्या 3,870 स्पर्धकांतून 500 डान्सर्सची निवड झाली. ते शानदार नृत्य सादर करतील. वीरगाथा स्पर्धेत राष्ट्रनायकांवर गाणी, निबंध आणि कथा लिहिणारे 25 युवा विजेता निवडले आहेत. तेही परेडमध्ये सहभागी होतील.
ड्रोनद्वारे राष्ट्र नायकांना सलामी
परेडसाठी प्रथमच 1,000 ड्रोनचा ताफा सज्ज आहे. त्याद्वारे तंत्रज्ञानाचे प्रदर्शन केले जाईल. राजपथाच्या आकाशात ड्रोन्सना एकाच वेळी कंट्रोल करण्याची क्षमता दिसेल. 5 मध्य आशियाई देशांच्या राष्ट्राध्यक्षांपुढे आकाशात तिरंगा, संविधान आणि स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाचाही उद्घोष केला जाणार आहे.