नवी दिल्ली – उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीचे बिगुल वाजले असून निवडणुकीपूर्वी काही ओपिनियन पोलमध्ये भाजप जिंकणार असे भविष्य वर्तवण्यात येत आहे. असे असले तरी अखिलेश यादव यांच्या नेतृत्वात समाजवादी पक्ष भाजपला चांगलीच टक्कर देण्यार आहे. इंडिया टीव्हीच्या ओपिनियन पोलमध्ये भाजपला 230 ते 235 जागा मिळतील असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.
मतदानपूर्व सर्वेक्षणात समाजवादी पक्ष भाजपला चांगलीच टक्कर देत आहे. 403 जागा असलेल्या उत्तर प्रदेशमध्ये समाजवादी पक्षाला 160 ते 165 जागा मिळण्याचा अंदाज व्यक्त होत आहे. तर कॉंग्रेसला 3 ते 7, बसपाला 2 ते 5 जागा मिळतील असा अंदाज इंडिया टीव्हीच्या ओपिनियन पोलमध्ये व्यक्त करण्यात आला आहे.
पूर्वांचलमध्ये भाजपला फटका
ओपिनियन पोलनुसार पूर्वांचलमध्ये भाजप आणि समाजवादी पक्षात चांगलीच टक्कर असणार आहे असा अंदाज व्यक्त केला आहे. पूर्वांचलमध्ये भाजपला फटका बसणार असून 124 जागांपैकी 66 जागा मिळतील तर सपाला 51 जागा मिळतील असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. 2016 साली पूर्वांचलमध्ये भाजपला 94 जागा मिळाल्या होत्या तर सपाला 14 जागांवर समाधान मानावे लागले होते.
ओपिनियन पोलनुसार गोरखपूर मतदारसंघातून मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा दणदणीत विजय होणार आहे. गोरखपूर हा विधानसभा मतदारसंघ पूर्वांचल विभागात आहे आणि हा मतदारसंघ भाजपचा बालेकिल्ला समजला जातो. मुख्यमंत्री योगी स्वतः गोरखपूर लोकसभा मतदारसंघातून 1998 पासून सलग पाच वेळा खासदार झाले आहेत. 2017 साली मुख्यमंत्री झाल्यानंतर त्यांनी या मतदारसंघातून राजीनामा दिला आणि विधानपरिषदेतून आमदार झाले.