मुंबई – जेमिमा रॉड्रिग्ज, शिखा पांडे, हरलीन देओल, राधा यादव, वेदा कृष्णमूर्ती या प्रमुख खेळाडूंना वगळून बीसीसीआयने आगामी काळात होत असलेल्या महिलांच्या विश्वकरंडक क्रिकेट स्पर्धेसाठी भारताचा संघ जाहीर केला आहे.
मिताली राजच्या नेतृत्वाखाली 15 सदस्यीय संघाची घोषणा करण्यात आली आहे. हरमनप्रीत कौरला विश्वकरंडकासाठी उपकर्णधार बनवण्यात आले असून रिचा घोष आणि तानिया भाटिया यांची यष्टिरक्षक म्हणून निवड करण्यात आली आहे.
जेमिमा रॉड्रिग्ज, शिखा पांडे, हरलीन देओल, राधा यादव, वेदा कृष्णमूर्ती यांसारख्या चेहऱ्यांना भारतीय संघात स्थान मिळू शकलेले नाही. जेमिमाची निवड न होणे हे सर्वात आश्चर्यकारक आहे. तिने अलीकडेच इंग्लंडमधील द हंड्रेड आणि ऑस्ट्रेलियातील महिला बिग बॅश लीगमध्ये चमकदार कामगिरी केली होती. तर सबीनीन मेघना, एकता बिश्त आणि सिमरन दिल बहादूर यांना राखीव खेळाडूंत ठेवण्यात आले आहे.
या विश्वकरंडकापूर्वी भारतीय संघ न्यूझीलंडसोबत एकदिवसीय मालिकाही खेळणार आहे. ही मालिका 11 फेब्रुवारीपासून खेळवली जाणार आहे. यामध्ये पाच सामने होणार आहेत. एकदिवसीय मालिका 24 फेब्रुवारीपर्यंत चालणार आहे. एक सामना नेपियरमध्ये आणि नेल्सन आणि क्वीन्सटाऊनमध्ये प्रत्येकी दोन सामने खेळवले जातील. न्यूझीलंड दौऱ्यावर भारताला यजमान संघाविरुद्ध टी-20 सामनाही खेळायचा आहे. हा सामना 9 फेब्रुवारी रोजी होणार आहे. त्यासाठी संघही जाहीर करण्यात आला आहे. हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वाखाली या सामन्यासाठी 16 सदस्यीय संघाची निवड करण्यात आली आहे.
भारताचा महिला संघ – मिताली राज (कर्णधार), हरमनप्रीत कौर (उपकर्णधार), स्मृती मानधना, शेफाली वर्मा, यास्तिका भाटिया, दीप्ती शर्मा, रिचा घोष (यष्टिरक्षक), स्नेह राणा, झुलन गोस्वामी, पूजा वस्त्रकार, मेघना सिंग, रेणुकासिंग ठाकूर, तानिया भाटिया. (यष्टिरक्षक), राजेश्वरी गायकवाड आणि पूनम यादव.
राखीव – सबीनीन मेघना, एकता बिश्त आणि सिमरन दिल बहादूर.
भारताचा टी-20 संघ – हरमनप्रीत कौर (कर्णधार), स्मृती मानधना (उपकर्णधार), शेफाली वर्मा, यास्तिका भाटिया, दीप्ती शर्मा, रिचा घोष (यष्टिरक्षक), स्नेह राणा, पूजा वस्त्राकर, मेघना सिंग, रेणुका सिंग ठाकूर, तानिया भाटिया (यष्टीरक्षक), राजेश्वरी गायकवाड. पूनम यादव, एकता बिश्त, एस. मेघना आणि सिमरन दिल बहादूर.
भारताच्या सामन्यांचे वेळापत्रक
महिला विश्वकरंडक स्पर्धेत भारतीय संघाचा पहिला सामना 6 मार्चला परंपरागत प्रतिस्पर्धी पाकिस्तान विरुद्ध टोरंगा येथे होणार आहे. त्यानंतर भारताचे सामने न्यूझीलंड (10 मार्च), वेस्ट इंडिज (12 मार्च), इंग्लंड (16 मार्च), ऑस्ट्रेलिया (19 मार्च), बांगलादेश (22 मार्च) आणि दक्षिण आफ्रिका (27 मार्च) यांच्याशी होणार आहेत.