पुणे – विमानाने येवुन घरफोडी करणा-या आंतरराज्यीय चोरांना युनिट 4 कडुन अटक करण्यात आली. त्यांच्याकडून 6 लाख 37 हजाराचे 130 ग्रॅम सोने हस्तगत करण्यात आले.
परवेज शेर मोहम्मद खान (43 धंदा- कपडे वक्री, रा. ग्रेटर नोयडा, उत्तर प्रदेश) व तस्लीम अरिफ समशुल खान (23 रा. मु. पो. धुमरी ता. अलीगंज जि. ऐटा, उत्तर प्रदेश ) अशी अटक आरोपींची नावे आहेत.
पुणे शहरात घडत असलेल्या घरफोडी गुन्हयांच्या पार्श्वभूमीवर युनिट 4 च्या पथकाला आंतरराज्यीय रेकॉर्डवरील गुन्हेगार पुणे शहरात रेकी करुन घरफोडीचे गुन्हे करित असल्याची खबर मिळाली होती. याबाबत सखोल तपास करता पोलीस अंमलदार राकेश
खुणवे व अशोक शेलार यांना संबंधीत व्यक्ती लोहगाव येथे थांबले असल्याची माहिती मिळाली.
त्यानूसार उप-निरीक्षक जयदीप पाटील, महेंद्र पवार, राजस शेख, राकेश खुणवे, संजय आढारी, प्रविण भालचिम, विशाल शिर्के, दत्ता फुलसुंदर, अशोक शेलार, रमेश राठोड यांनी सापळा रचुन दोघांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडे कसोशिने तपास केला असता त्यांनी विश्रांतवाडी पोलीस स्टेशनचे कार्यक्षेत्रात घरफोडी चोरी केल्याची ठिकाणे दाखवली आरोपी वॉचमन नसलेल्या सोसायटयांची रेकी करुन त्यामध्ये चोरी करत असल्याचे तपासात निष्पन्न झालेले आहे. ते उत्तर प्रदेश येथुन विमानाने पुण्यात येऊन चोरी करायचे व तात्काळ परत निघुन जायचे.
आरोपी परवेज शेर मोहम्मद खान याचेविरुध्द चोरीचे पुणे व पिंपरी चिंचवड आयुक्तालयात यापुर्वी गुन्हे दाखल आहेत. तर तस्लीम अरिफ समशुल खान याचेविरुध्द दिल्ली येथे चोरीचे गुन्हे दाखल आहेत. परवेज खान याच्यावर हा कपडे विक्रीचा व्यवसाय करायचा, तो पुर्वी विश्रांतवाडी परिसरात रहायला असल्याने त्याला परिसराची खडाणखडा माहिती होती. 2016 मध्ये त्याला एका घरफोडीच्या गुन्हयात अटक झाल्यावर शिक्षा भोगून तो पुन्हा उत्तर प्रदेशात रवाना झाला होता.
लॉकडाऊन नंतर पुन्हा तो त्याच्या साथीदारांना घेऊन पुण्यात घरफोडी करायला लागला होता. तो उत्तर प्रदेशातून येताना स्थानिक गुन्हेगार मदतीला घेऊन येत होता. मागील महिण्यात त्याने विश्रांतवाडी परिसरात दोन घरफोड्या केल्या होत्या. गुन्हा केल्यानंतर काही तासातच तो पुन्हा उत्तर प्रदेशात विमानाने रवाना होत होता. यामुळे तो पोलिसांच्या हाती लागत नव्हता.
सदरची कामगिरी पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता, सह-आयुक्त रविंद्र शिसवे, अपर पोलीस आयुक्त रामनाथ पोकळे, उप आयुक्त श्रीनिवास घाडगे, सहा पोलीस आयुक्त लक्ष्मण बोराटे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक जयंत राजुरकर यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.
घराला कुलूप म्हणजे चोरांना निमंत्रण
आरोपी वॉचमेन नसल्येल्या सोसायटीमध्ये जाऊन कुलूप लावलेली घरे हेरायचे. कडी कोयंडा काही मिनिटात उचकटून ते घरात घुसून चोरी करायचे. यामुळे नागरिकांनी घराला लॅच लॉक लावावे, जेणे करुन चोरांना समजणार नाही की घरात माणसे आहेत की नाहीत. घराला कुलूप लावून बाहेर जाणे हे एक प्रकारे चोरीला निमंत्रणच ठरत आहे. – जयंत राजूरकर (वरिष्ठ पोलीस निरीक्षक, युनिट – 4)