मुंबई – क्रुझ ड्रग्जप्रकरणी अखेर आर्यन खानला मुंबई उच्च न्यायालयाने दिलासा दिला आहे. आता दर आठवड्याला एनसीबीच्या मुंबईतील कार्यालयात हजेरी लावण्याची आता आवश्यकता नाही, असे स्पष्ट करत हायकोर्टाने ही अट रद्द केली आहे.
जर एनसीबीला आर्यनची चौकशी करायची असल्यास तपासयंत्रणेने तशी नोटीस जारी करावी. दिल्लीतील कार्यालयात हजेरीसाठी किमान 72 तास आधी एनसीबीच्या एसआयटीने आर्यनला नोटीस द्यावी, असे निर्देश न्यायालयाने दिले.
याप्रकरणी न्यायमूर्ती नितीन सांब्रे यांच्यापुढे बुधवारी सुनावणी पार पडली. कॉर्डिलिया क्रुझ ड्रग्सप्रकरणी जामीन मंजूर करण्यात आलेल्या आर्यन खानने शुक्रवारी मुंबई उच्च न्यायालयात पुन्हा एकदा याचिका दाखल केली आहे.
याप्रकरणी न्यायालयाने जामिनासाठी घातलेल्या काही अटीं-शर्तींमध्ये शिथिलता आणावी, अशी मागणी अर्जाद्वारे करण्यात आली होती. या अर्जाला एनसीबीच्या वतीनेही विरोध करण्यात आला नाही.