कराची – पाकिस्तान दौऱ्यावर दाखल झाल्यावर लगेचच वेस्ट इंडिज क्रिकेट संघाला करोनामुळे मोठा धक्का बसला आहे. मालिका सुरु होण्यापूर्वीच वेस्ट इंडिज संघातील शेल्डन कॉट्रेल, रोस्टन चेस आणि काइल मेयर्स यांच्यासह सपोर्ट स्टाफमधील एका व्यक्तीला करोनाची बाधा झाल्याचे समोर आले.
या सर्वांना पुढील 10 दिवस विलगीकरणात पाठवले गेले आहे. वेस्ट इंडिज संघातील सर्व खेळाडूंना करोनाचे दोन्ही डोस देण्यात आले होते. मात्र, तरीही यातील चार जण बाधित आढळले आहेत. ज्या खेळाडूंचा करोनाचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे त्यापैकी कोणालाही करोनाची लक्षणे दिसली नव्हती. संघातील अन्य खेळाडू आणि सदस्यांचा करोना अहवाल निगेटिव्ह आला आहे.
वेस्ट इंडिजच्या पाकिस्तान दौऱ्याचा प्रारंभ सोमवारी होत असलेल्या पहिल्या टी-20 सामन्याने होणार आहे. या दौऱ्यात 3 टी-20 आणि 3 एकदिवसीय सामने होणार आहेत. या दोन्ही मालिका कराचीतच खेळवल्या जाणार आहेत.
कडेकोट सुरक्षा
न्यूझीलंड, इंग्लंड आणी ऑस्ट्रेलिया या संघांनी सुरक्षेच्या कारणामुळे पाकिस्तानमध्ये खेळण्यास नकार दिला होता. त्या पार्श्वभूमीवर वेस्ट इंडिजचा संघ पाकिस्तान दौऱ्यावर आला आहे. यासाठी कराची स्टेडियम व खेळाडू राहणार असलेल्या हॉटेलला लष्करी छावणीचे स्वरूप आले आहे. खेळाडूंच्या सुरक्षेसाठी कराची पोलिस विभागातील 13 वरिष्ठ अधिकारी, 315 बिगर सरकारी संघटना, 3 हजार कॉन्स्टेबल, 50 महिला पोलिस, शिघ्र कृती दलाचे 500 जवान व 800 कमांडोसह 46 डीएसपी यांची नियुक्ती करण्यात आली आहे.