जामखेड – राज्याच्या मंत्रिमंडळाचा लवकरच विस्तार होणार असून माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या राजीनाम्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसची कॅबिनेट मंत्रीपदाची एक जागा रिकामी झाली आहे. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसच्या कोट्यातून जागा भरली जाणार आहे. हिवाळी अधिवेशनाच्या आधीच हा विस्तार होऊ शकतो. कर्जत जामखेडचे आमदार रोहित पवार यांच्या रूपाने मतदार संघाला तिसऱ्यांदा मंत्रिमंडळात स्थान मिळू शकते अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे. त्यांनी कर्जत-जामखेडमधून राम शिंदे यांच्यासारख्या दिग्गज भाजपा नेत्याचा पराभव केला होता. त्यामुळे त्यांच्याविषयी सर्वसामान्यांच्या अपेक्षा बऱ्याच उंचावल्या आहेत. त्यांना थेट कॅबिनेट मंत्रीपदाची संधी मिळू शकते अशी माहिती विश्वसनिय सूत्रांनी दिली आहे.
अनिल देशमुख यांच्या राजीनाम्यानंतर गृहविभागाची धुरा दिलीप वळसे पाटील यांच्याकडे सोपवण्यात आली आहे. त्यामुळे वळसे पाटील यांच्याकडे पूर्वी असलेले कामगार आणि उत्पादन शुल्क ही खाती रोहित पवार यांच्याकडे दिली जाण्याची शक्यता आहे. कोल्हापूरकडे दुर्लक्ष होत असल्याचे सांगत अहमदनगरचे पालकमंत्रीपद भूषवण्यास हसन मुश्रीफ यांनी नकार दिल्याचे कळतेय. त्यामुळे पालकमंत्री पदाची जबाबदारीही रोहित पवार यांच्याकडे दिली जाण्याची शक्यात सूत्रांनी वर्तवली आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या तिसऱ्या पिढीचे वारसदार आणि राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांचे नातू म्हणून रोहित पवार यांच्याकडे पाहिले जातेय. तरुण चेहरा आणि विकासासाठी आलेली तळमळ आमदार झाल्यानंतर विकासाच्या मुद्यावर अक्टीव्ह असणे आदी मुद्दे रोहित पवार यांच्याबाजूने असल्याचे बोलले जातेय. रोहित पवार हे कॅबिनेट मंत्री झाले तर गेल्या अनेक वर्षांपासून कर्जत जामखेड मतदार संघाच्या विविध विकास कामामध्ये वाढ होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. त्याचप्रमाणे बऱ्याचदा कोल्हापूरकडे दुर्लक्ष होत असल्याचं सांगत अहमदनगरचे पालकमंत्रीपद भूषवण्यास हसन मुश्रीफ यांनी नकार दिल्याचे समजते. त्यामुळे पालकमंत्रीपदाची जबाबदारीही रोहित पवार यांच्याकडे दिली जाण्याची शक्यता आहे.
राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण
मागील पंचवार्षिक मध्ये भाजपाचे प्रा. राम शिंदे यांना राज्यमंत्री सह महत्वाचे जलसंधारण खाते मिळाले होते. त्यामुळे कर्जत-जामखेड मतदार संघाला आमदार रोहीत पवार यांच्या माध्यमातून पुन्हा एकदा मंत्रिपद मिळत असल्याची बातमी मतदार संघात धडकताच राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असून मंत्रीपदाबद्दल अद्याप आमदार रोहित पवार यांनी कोणतेही प्रतिक्रिया दिली नसतानाही कार्यकर्त्यांनी भावी मंत्री म्हणून आमदार रोहित पवार याना सोशल मीडियाव्दारे शुभेच्छा देण्यास सुरुवात केली आहे.