ठाणे, – ठाणे जिल्ह्यातील भिवंडी येथे काल लागलेल्या आगीत तेथील कपड्यांची पाच दुकाने खाक झाली आहेत. तेथील द्रौपदी कंपाऊंडमधील एका गोदामाला शनिवारी रात्री दीडच्या सुमाराला आग लागली. त्यानंतर ही आग अन्यत्र पसरली.
याच कंपाऊंडमध्ये अन्यही गोदामे होती. त्यातील चार गोदामातील कपड्यांच्या गाठड्या यात जळून खाक झाल्या. अग्निशमन दलाचे दोन बंब घटनास्थळी दाखल झाले होते, पण त्यांना ही आग आटोक्यात आणायला बराच वेळ लागला.
मध्यरात्रीच्या सुमाराला लागलेली आग सकाळी साडेआठ वाजण्याच्या सुमाराला नियंत्रणात आली. आग नेमकी कशामुळे लागली याचे कारण समजू शकले नाही. सुदैवाने ही गोदामे कुलपबंद अवस्थेत असल्याने तेथे कोणतीही जीवितहानी झाली नाही.