पिंपरी -एसटीच्या संपामुळे राज्या अंतर्गत सार्वजनिक वाहतूक सेवा ठप्प झाली आहे. यामुळे बाहेरगावी जाणाऱ्या नागरिकांसमोर मोठ्या अडचणी निर्माण झाल्या. खासगी बसचे अवास्तव भाडे आणि ठराविक वेळीच या बस सुटत असल्याने नागरिक त्रस्त आहेत.
यावर नागरिकांनी स्वत:च तोडगा शोधत सोशल मीडिया आणि ऍपचा पुरेपूर वापर सुरू केलेला दिसून येत आहे. वेगवेगळ्या व्हॉट्स ऍप, फेसबुक ग्रुपवर आपल्याला कुठे आणि कधी जायचे आहे, याची पोस्ट नागरिक टाकून लिफ्ट मिळवित आहेत किंवा ऍपच्या माध्यमातून त्या ठिकाणी कोण जाणार आहे, याचा शोध घेत आहेत.
सध्या सोशल मीडियाच्या अनेक ग्रुपवर अशा पोस्ट दिसून येतात. अशा पोस्टला नागरिकांकडून प्रतिसादही मिळत आहे. ज्या नागरिकांना आपले खासगी वाहन घेऊन बाहेरगावी जायचे आहे. ते देखील पोस्ट टाकून सोबत प्रवास करणारे सहकारी मिळवत आहेत.
अशी सेवा देणारे एस राइड, ब्ला-ब्ला सारखे काही ऍप देखील सध्या जोरात सुरू आहे. लांब पल्ल्याच्या प्रवासाकरिता समाजमाध्यमांवर पोस्ट केलेल्या माहितीवरुन संबंधित व्यक्तीशी संपर्क साधत, देवदर्शनाबरोबरच, पर्यटन, लग्नकार्य व इतर कार्यक्रमासाठी इच्छीतस्थळी खासगी वाहनातून प्रवास करण्याचा मार्ग सुकर झाला आहे.
तर परतीच्या प्रवासालादेखील अनेक ऍपचा प्रवाशांकडून प्रभावीपणे वापर होत आहे. परवडणाऱ्या दरात हा प्रवास करता येत असल्याने एसटी कर्मचाऱ्यांचा संप आणि खासगी वाहतूकदारांकडून होणाऱ्या त्रासातून टेक्नोसॅव्ही प्रवाशांना दिलासा मिळाला आहे.
एसटी कर्मचाऱ्यांचा संप सुरू असल्याने लांबचा पल्ल गाठण्यासाठी खासगी वाहतुकीचा पर्याय समोर आला. मात्र संपकाळाचा गैरफायदा घेत चौपट तिकीट दर आकारणाऱ्या खासगी वाहतूकदारांनी प्रवाशांची आर्थिक लूट सुरू केली.
गरज ही शोधाची जननी आहे, याप्रमाणे एसटी कर्मचाऱ्यांचा संप आणि खासगी वाहतुकदारांकडून होणाऱ्या आर्थिक लुटीला पर्याय सापडला आहे. फेसबुक, व्हॉटसअप ग्रुप, इन्स्टाग्राम अशा विविध समाज माध्यमांवर आता लांब पल्ल्याचा प्रवासाचा मार्ग व संपर्क क्रमांकासह उपलब्ध करुन दिली जात आहे.
केलेल्या पोस्टवरील माहितीची खात्री करुन घेत, शेअर-ए-रिक्षाच्या धर्तीवर चारचाकीत विविध भागांमधील प्रवासी परवडणाऱ्या दरात प्रवास करत आहेत. आता देवदर्शन व नातेवाईकांकडील कार्यक्रम पार पडल्यानंतर पुन्हा घरी परतण्यासाठी विविध ऍपच्या माध्यमातून प्रवासाचे अनेक पर्याय उपलब्ध होत आहेत. त्यामुळे हा प्रवास सुकर आणि परवडणाऱ्या दरात करता येणे शक्य झाले आहे.
मला नाशिकला जायचे होते, खासगी बसचे भाडे खूप वाढल्याने मी आमच्या काही ग्रुपवर पोस्ट टाकली. ग्रुपमधून जाणारे कुणी नव्हते पण काही लोकांनी मला काही ऍप सुचविले. त्यापैकी एका ऍपच्या माध्यमातून मी एका कारने नाशिकला पोहचले, ते ही अवघ्या साडे चारशे रुपयांमध्ये. सह प्रवाशांसोबत देखील चांगली ओळख झाली.
– ज्येष्ठ नागरिक महिला.