“इगो’ दुखावल्याने रॉकेल बॉम्ब हल्ला

विरोधकांना ब्लॅकमेल करून पैसे उकळण्याचाही होता डाव

पिंपरी – वाढदिवसानिमित्त घेऊन गेलेला केक न कापल्याने इगो दुखावलेल्या तरुणाने आमदार लक्ष्मण जगताप यांचे बंधू शंकर जगताप यांच्या कार्यालयावर रॉकेलबॉम्ब हल्ला केल्याची बाब पोलीस तपासात उघड झाली आहे.

तसचे या हल्ल्यामागे तुमचा हात आहे, अशी कबुली देऊन विरोधकांकडून मोठी रक्‍कम उकळण्याचा देखील आरोपींचा डाव होता. मात्र त्यापूर्वीच आरोपींना पोलिसांनी आरोपींना बेड्या ठोकल्या.

विशेष म्हणजे माजी विरोधी पक्ष नेते आणि दिवंगत दत्ता साने यांच्या कार्यालयावर हल्ला केलेल्या आरोपींनी हा कट रचल्याचे निष्पन्न झाले आहे, अशी माहिती पोलीस आयुक्‍त कृष्णप्रकाश यांनी शुक्रवारी (दि.26) पत्रकार परिषदेत दिली.

तन्मय रामचंद्र मदने (वय 19, पिंपळे गुरव), विक्रम विजय जवळकर (वय 20, रा. रेल्वे समोर, कासारवाडी), प्रद्युम्न किशोर भोसले (वय 23, पिंपळे गुरव) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. तर त्यांच्या दोन अल्पवयीन साथीदारांना ताब्यात घेतले आहेत. याशिवाय स्व. नगसेवक दत्ता साने यांच्या कार्यालयावर हल्ला केलेले सॅमसंग सुलेमान ऍमेट आणि देवेंद्र रामलाल बिडलान या दोन सराईत गुन्हेगारांनी हा कट रचला होता ; तर प्रद्युम्न भोसले हा या हल्ल्याचा मास्टरमाईंड असल्याचे उघड झाले आहे.

प्रद्युम्न भोसले याचा 7 सप्टेंबर रोजी वाढदिवस होता. वाढदिवसानिमित्त मास्टरमाइंड असे लिहिलेला केक घेऊन आरोपी तन्मय व आरोपी प्रद्युम्न हे त्यांच्या मित्रांसोबत चंद्ररंग डेव्हलपर्स या कार्यालयात आमदार लक्ष्मण जगताप यांचे बंधू व माजी नगरसेवक शंकर जगताप यांच्या हस्ते केक कापण्यासाठी आले होते. परंतु शंकर जगताप हे त्यांच्या कामाच्या व्यस्ततेमुळे केक न कापता त्यांच्या कार्यकर्त्यांसोबत गाडीत बसून निघून गेले.

याचा राग प्रद्युम्न भोसले यांच्या मनात होता. भोसले याचे वर्गमित्र असलेल्या सॅमसंग सुलेमान ऍमेट आणि देवेंद्र रामलाल बिडलान या दोन्ही सराईत गुन्हेगारांनी दत्ता साने यांच्या कार्यालयावर हल्ला केल्यानंतर, या प्रकरणात आम्ही तुमचे नाव घेऊ, अशी धमकी देत साने यांच्या राजकीय विरोधकाकडून मोठी रक्कम उकाळल्याचे सांगितले. या फॉर्म्युल्यातून शंकर जगताप यांच्या कार्यालयावर हल्ला करून जगताप यांच्या राजकीय विरोधकांकडून मोठी रक्कम उकळण्याचा कट रचला होता.

मात्र, या त्यापूर्वीच पोलिसांनी आरोपींना अटक केली. या गुन्ह्यात वापरलेल्या दुचाकीवरुन आरोपींचा शोध घेण्यात पोलिसांना यश आले. गुन्ह्यात वापरलेली दुचाकी विक्रम जवळकर याने आरोपींना पुरविली होती. त्याच्या घरी गोठ्यात या गुन्ह्याचा कट रचण्यात आला होता. सांगवी पोलीस तपास करत आहेत.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.