नांदेड : राज्यातील विद्यापीठीय व महाविद्यालयीन शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांच्या न्याय व रास्त मागण्याच्या पूर्ततेसाठी महाराष्ट्र विद्यापीठीय व महाविद्यालयीन संयुक्त कृती समितीच्या वतीने संपूर्ण राज्यातील अकृषी विद्यापीठ आणि महाविद्यालयांमध्ये दि.२२ नोव्हेंबर रोजी एक दिवसीय ‘लाक्षणिक संप‘ पुकारण्यात आलेला आहे. या लाक्षणिक संपामध्ये स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ कृती समितीने सहभागी होण्याचा निर्णय घेतला आहे.
शासनाच्या आडमुठे धोरणामुळे व अन्यायकारक भूमिकेच्या निषेधार्थ आंदोलनाचा पवित्रा कृती समितीस घ्यावा लागला आहे. विद्यापीठ व महाविद्यालयीन कर्मचारी यांची सेवांतर्गत आश्वासित प्रगती योजनेचे रद्द केलेले शासन निर्णय पुनर्जीवित करणे, अकृषी विद्यापीठातील ७९६ राहिलेल्या पदांना सातवा वेतन आयोग लागू करणे, विद्यापीठीय शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांना ५८ महिन्याची थकबाकी देणे यासह महत्त्वाच्या १२ प्रमुख मागण्यांच्या पूर्ततेसाठी आंदोलन करण्यात येत आहे.
राज्यातील विद्यापीठ व महाविद्यालयातील शिक्षकेत्तर कर्मचारी लाक्षणिक संपामध्ये सहभागी होणार आहेत. त्यामूळे विद्यापीठात येणाऱ्या प्राध्यापक, विद्यार्थी आणि अभ्यागतांची या संपामुळे गैरसोय होणार असल्यामुळे स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ कृती समितीकडून दिलगिरी व्यक्त कराण्यात येत असल्याचे कृती समितीच्या पदाधिकाऱ्यांनी कळविले आले आहे.