पुणे :- पाथ-वे फाउंडेशनच्या वतीने आयोजित दोशी इंजिनियर्स करंडक आंतरक्लब 25 वर्षांखालील निमंत्रित क्रिकेट स्पर्धेत साखळी फेरीत अनिश पालेशाने केलेल्या अष्टपैलू खेळीच्या जोरावर अँबिशियस क्रिकेट अकादमीने मेट्रो क्रिकेट क्लबचा 8 धावांनी पराभव करत सलग तिसऱ्या विजयासह उपांत्य फेरीत प्रवेश केला.
पूना क्लब क्रिकेट मैदानावर झालेल्या लढतीत प्रथम फलंदाजी करताना अँबिशियस क्रिकेट अकादमीचा डाव 30.4 षटकात 164 धावांवर कोसळला. यात अनिश पालेशा 42, तनिश जैन 25, ऋषिकेश बारणे 22, रोहित हाडके 16 यांनी छोटी पण महत्त्वपूर्ण खेळी केली. मेट्रो क्रिकेट क्लबच्या रेहान खानने भेदक गोलंदाजी करत 32 धावांत निम्मा संघ बाद केला.
गुरवीर सिंग सैनीने 4 गडी बाद करत त्याला सुरेख साथ दिली. प्रत्युत्तरात मेट्रो क्रिकेट क्लबला 43.5 षटकात 156 धावांपर्यच मजल मारता आली. यामध्ये शशिकांत पवार 33, प्रशम गांधी 33, ऋषभ बन्सल 24, उबेद खान 12, निशांत नगरकर 10 यांनी दिलेली लढत अपुरी ठरली.
अँबिशियस क्रिकेट अकादमीच्या अनिष पालेशा आणि तनय सांघवी यांनी प्रत्येकी 3-3 विकेट घेतल्या. ब्रिलियंटस स्पोर्टस अकादमीच्या मैदानावर झालेल्या अन्य लढतीत ब्रिलियंटस स्पोर्टस अकादमी संघाने डेक्कन जिमखाना संघाचा 36 धावांनी पराभव करत दुसरा विजय नोंदविला.