नाशिक – अल्पवयीन प्रेमीयुगुलाने विष प्राशन करून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याची घटना समोर आली आहे. प्रेमाची चर्चा गावभर झाल्याने तसेच अल्पवयीन असल्यामुळे लग्नास येणाऱ्या अ़डचणी यामुळे हे दोघे नैराश्यात गेले त्यामधूनच या प्रेमी युगुलाने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला आहे.
ही घटना नाशिक जिल्ह्यातील मालेगाव देवळा गावात घडली आहे. देवळा मालेगाव रस्त्यावरील एका हॉटेलमध्ये ही धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी पोलिसांनी हॉटेल मॅनेजरसह प्रेमी युगुलाविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
या घटनेबाबत सविस्तर वृत्त असे की, देवळा येथील प्रेमी युगुलाचे मागील काही वर्षांपासून प्रेमसंबंध सुरू होते. मात्र अलीकडेच त्यांच्या प्रेमप्रकरणाची माहिती गावातील नागरिकांना कळाली होती. प्रेमसंबंधाची वाच्यता झाल्यानंतर बदनामी टाळण्यासाठी दोघांनी लग्न करण्याचा विचार केला. पण दोघंही अल्पवयीन असल्याने लग्न करण्यातही अडचणी आल्या.यामुळे दोघंही गेल्या काही दिवसांपासून नैराश्याचा सामना करत होते.
लग्न करता येत नसल्यामुळे दोघांनी एकत्रित आत्महत्या करण्याचा निर्णय घेतला. यासाठी दोघांनी मालेगाव देवळा रोडवरील वेलकम हॉटेलमध्ये रुम बुक केली. याच खोलीत दोघांनी विषारी तणनाशक औषध प्राशन केले. ही बाब एका हॉटेल कर्मचाऱ्याच्या लक्षात आली. हॉटेलमधील कर्मचाऱ्यांनी दोघांनाही स्थानिक रुग्णालयात उपचासाठी दाखल केले. पण दोघांची प्रकृती चिंताजनक असल्याने मुलाला मालेगावातील सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले. तर मुलीवर एका खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.