एमबीएची प्रवेश परिक्षा पास करुण देण्याची हमी देणाऱ्यास पोलिसांनी ठोकल्या बेड्या

पुणे  – आंतरराष्ट्रीय स्तरावरील एमबीएची प्रवेश परिक्षा पास करुण देण्याची हमी देणाऱ्यास सायबर पोलिसांनी अटक केली आहे. संबंधीत व्यक्ती गुणांप्रमाणे अडीच लाख ते चार लाख रुपये आकारत होता. यासाठी तो एका ऍप्लिकेशनव्दारे प्रवेश परिक्षेसंबंधीत वेबसाईटचा ऍक्‍सेस स्वत:कडे मिळवला होता.

अभय मिश्रा (रा. मानगो, जमशेदपूर, झारखंड) यास अटक केली असून त्याचेकडून 1 लॅपटॉप, 1 मोबाईल संच, 4 पेनड्राईव्ह, 4 डेबीट कार्ड व इतर साहित्य जप्त करण्यात आले आहे. फिर्यादी यांना परदेशात एमबीए करणेकरिता प्रवेश घ्यावयाचा असल्याने त्यांनी सोशल नेटवर्किंग साईटवर जीमॅट या एमबीए पूर्व परिक्षेबाबत सर्च केले असता त्यांना GMAT_GRE_SHORTCUT ही इन्स्टाग्राम प्रोफाईल दिसून आली.

त्यामध्ये प्रवेशाकरिता असणाऱ्या जीमॅट या पूर्व परिक्षेमध्ये 100 टक्के चांगल्या गुणांची हमी देण्यात आली होती. त्यानुसार फिर्यादी यांनी सदर इन्टाग्राम प्रोफाईलच्या माध्यमातून प्रोफाईल धारकाशी संपर्क साधून सर्व प्रक्रिया पूर्ण केली. त्यानुसार 750 पेक्षा अधिक गुणांकरिता 4 लाख, 740 पेक्षा अधिक

गुणांकरिता 3 लाख 70 हजार, 730 पेक्षा अधिक गुणांकरिता 3 लाख 50 हजार, 720 पेक्षा अधिक गुणांकरिता 3 लाख, 710 पेक्षा अधिक गुणांकरिता 2 लाख सत्तर हजार आणि 700 पेक्षा अधिक गुणांकरिता 2 लाख 50 हजार असे रेट असल्याचे आरोपींनी सांगितले. 

त्यानुसार यातील आरोपी यांनी फिर्यादी यांच्या संगणकाचा ऐनीडेस्क, डीडब्ल्यू सर्व्हिसेस व वुई ट्रान्सफर या ऍप्लीकेशनद्वारे ऍक्‍सेस घेऊन आंतराष्ट्रीय एमबीएची पूर्व परिक्षा फिर्यादी हेच देत आहेत असे भासवुन यातील आरोपी यांनी पूर्व परिक्षा दिली. त्यामध्ये फिर्यादी यांना खरोखरच 850 पैकी 770 गुण मिळाले.

त्यामुळे यातील आरोपी यांनी फिर्यादी यांच्याकडे वारंवार 4 लाख रूपयांची मागणी केली. परंतु फिर्यादी यांना रक्कम द्यावयाची नसल्याने व वरील सर्व प्रकार हा फसवणुकीचा वाटल्याने त्यांनी तक्रार दाखल केली. त्यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार सायबर पोलीस स्टेशन माहिती तंत्रज्ञान अधिनियम प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला.

गुन्हा दाखल होताच सायबर पोलीस स्टेशन कडून सखोल तपास सुरू करण्यात आला. त्यामध्ये फिर्यादी यांचेशी संपर्क करण्यासाठी वापरण्यात आलेले इन्स्टाग्राम प्रोफाईल, बॅंक अकाऊंट, मोबाईल क्रमांक व ऐनीडेस्कच्या युजर आयडींचे तांत्रिक विश्‍लेषणामध्ये यातील आरोपी हे जमशेदपूर झारखंड येथील असल्याचे निष्पन्‌ झाले.

तांत्रिक माहितीच्या आधारे सायबर पोलीस स्टेशन कडील पोलीस निरीक्षक मिनल सुपे-पाटील व तपास पथक यांनी जमशेदपूर झारखंड येथे सापळा रचून आरोपीस जेरबंद केले
सदरची कामगिरी पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता, सह आयुक्त रविंद्र शिसवे, अपर पोलिस आयुक्त रामनाथ पोकळे, उपायुक्त भाग्यश्री नवटके यांच्या सुचनेनुसार

वरिष्ठ पोलीस निरीक्षक डी.एस. हाके यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक मिनल सुपे-पाटील, पोलीस उप निरीक्षक रविंद्र गवारी, अंमलदार अस्लम आत्तार, राजकुमार जाबा,शाहरूख शेख, श्रीकांत कबुले, शिरीष गावडे व निलम साबळे यांचे पथकाने उल्लेखनिय कामगिरी केली आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.