मुंबई – राज्यात वीज निर्मिती करणारे 27 पैकी 7 संच बंद आहेत. कोळश्याच्या अभावी हे संच बंद करावे लागले आहेत. त्याला कारणीभूत कोल इंडिया असल्याचे सांगत राज्यात कुठेही लोडशेडिंग करण्यात आलेले नाही. नो लोडशेडिंग हा आमचा कार्यक्रम आहे, असे उर्जामंत्री नितीन राऊत यांनी म्हटले आहे.
नितीन राऊत यांनी पत्रकार परिषद घेऊन राज्यातील विजेची परिस्थिती आणि कोळश्याच्या तुटवड्यावर माहिती दिली. कोळसा टंचाईमुळे राज्यातील वीज निर्मिती कमी झाली असून गरजेनुसार खुल्या बाजारातून महागड्या दराने वीज खरेदी करून ग्राहकांची वीजेची गरज भागवली जात आहे.
राज्यात कुठेही भारनियमन केले जात नसून वीज उत्पादन वाढविण्यासाठी योग्य नियोजन केले जात आहे. राज्यात मागणीच्या तुलनेत 3 हजार मेगावॅट विजेची कमतरता जाणवत आहे. ही विजेची तूट भरून काढण्यासाठी राज्य सरकार सर्वतोपरी प्रयत्न करत आहे, असे त्यांनी सांगितले.
मी सर्व ग्राहकांना जाहीर नम्र आवाहन करू इच्छितो की सध्याची वीज टंचाईची परिस्थिती लक्षात घेता सकाळ व संध्याकाळी 6 ते 10 या वीज मागणीच्या कमाल कालावधीत आपल्या घरातील विद्युत उपकरणांचा कमीत कमी वापर करून वीज बचत करून महावितरणला सहकार्य करा, असे आवाहन त्यांनी यावेळेस केले.