वाघोली – वाघोलीपासून जवळच असणाऱ्या भावडी येथे सोमवारी रात्री बिबट्याचे दर्शन झाले आहे. गावठाणाजवळ उसाच्या शेताच्या कडेला बसलेला बिबट्या ग्रामस्थांनी मोबाईलच्या कॅमेऱ्यात टिपला आहे.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, वाघोली पासून जवळच असणाऱ्या भावडी गावाच्या गावठाणाजवळ सोमवारी रात्री दहाच्या सुमारास ऋषिकेश कांबळे हा तरुण शेताच्या कामानिमित्त बाहेर आला असता प्रवीण कांबळे यांच्या ऊसाच्या शेताच्या कडेला बिबट्या असल्याचे त्यास दिसले. त्याने तत्काळ नातेवाईक व ग्रामस्थांना याची माहिती दिली.}
ग्रामस्थांनी बिबट्यास मोबाईलच्या कॅमेऱ्यात टिपले आहे. ग्रामस्थ जमा झाल्यानंतर आवाजाने बिबट्याने शेतात पळ काढला. जवळपास पाच मिनिटे बिबट्या नजरेस पडत होता. संबंधित बाब नागरिकांनी वनविभागाला कळविली असून याबाबतची पुढील उपाययोजना करण्याचे काम वनविभागाकडून केले जात आहे. संबंधित बिबट्या गोलेगाव व परिसरात यापूर्वी दिसला असल्याचे कांबळे यांनी सांगितले.